Sharad Pawar | अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. मात्र या धक्क्यातून सावरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल आणि पुढील राजकीय दिशा याबाबत हालचालींना वेग आला आहे.
आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केलं. त्यातच त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला काहीही माहिती नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. या एका वक्तव्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
शरद पवारांच्या वक्तव्यानंतर कुटुंबाची हालचाल :
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतही भाष्य केलं. या निर्णयाची घोषणा 12 तारखेला होणार होती, असं त्यांनी सांगितलं. मात्र सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांतच राजकीय घडामोडी झपाट्याने बदलताना दिसल्या.
या वक्तव्यानंतर दोन तासांच्या आत पार्थ पवार (Parth Pawar) हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. या भेटीमागचं नेमकं कारण काय, दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र शरद पवारांच्या विधानानंतर अजित पवार कुटुंबातील व्यक्ती थेट भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय चर्चांना अधिकच वेग मिळाला आहे.
Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान हालचाली :
आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्याकडे दिली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील नेतृत्वाबाबत उत्सुकता वाढली असून सर्वांच्या नजरा आजच्या बैठकीकडे लागल्या आहेत.






