SEBI | सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) शेअर बाजारातील टिप्स (Share Market Tips) देऊन 104 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या अस्मिता जितेंद्र पटेल (Asmita Jitendra Patel) या महिला युट्यूबरवर (YouTuber) मोठी कारवाई केली आहे. ‘सेबी’ने अस्मिता यांच्याकडील 54 कोटी रुपये जप्त केले असून, त्यांच्यावर बंदीही घातली आहे. ‘ऑप्शन क्वीन’ (Option Queen) आणि ‘शी वुल्फ ऑफ स्टॉक मार्केट’ (She Wolf of Stock Market) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्मिता यांनी शेअर बाजार आणि ऑप्शन ट्रेडिंग टिप्सद्वारे (Option Trading Tips) गुंतवणूकदारांकडून (Investors) 104 कोटी रुपये कमावले होते.
नेमके प्रकरण काय?
अस्मिता पटेल यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडमधून (Global School of Trading Pvt Ltd) ट्रेडिंग शिकलेल्या काही गुंतवणूकदारांनी ‘सेबी’कडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर चौकशीदरम्यान, ‘सेबी’ला असे आढळून आले की, या संस्थेने ‘लेट्स मेक इंडिया ट्रेड’ (Lets Make India Trade), ‘मास्टर्स इन प्राइस ॲक्शन ट्रेडिंग’ (Masters in Price Action Trading) आणि ‘ऑप्शन्स मल्टीप्लायर’ (Options Multiplier) सारखे सशुल्क अभ्यासक्रम (Paid Courses) सुरू केले होते. मात्र, ही संस्था अभ्यासक्रम शिकवण्याच्या नावाखाली केवळ ट्रेडिंग आणि गुंतवणूक सल्ला देत होती. अस्मिता पटेल आणि त्यांच्या टीमने त्यांच्या अभ्यासक्रमांद्वारे गुंतवणूकदारांना विशिष्ट स्टॉकमध्ये (Stocks) गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. तसेच, त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर (Telegram Channel) स्टॉक खरेदी आणि विक्रीसाठी सल्ले देण्यात आले होते. गुंतवणूकदारांना एका विशिष्ट ब्रोकरेज फर्ममध्येच (Brokerage Firm) खाते उघडण्यास सांगण्यात आले होते, असे ‘सेबी’च्या तपासात दिसून आले.
अस्मिता यांनी सुरू केलेल्या अभ्यासक्रमांतून मिळणारे शुल्क सागर धनजीभाई यांच्या किंग ट्रेडर्स (King Traders), सुरेश परमाशिवम यांच्या जेमिनी एंटरप्राइजेस (Gemini Enterprises) आणि जिगर रमेशभाई दावडा यांच्या युनायटेड एंटरप्राइजेस (United Enterprises) यांसारख्या थर्ड पार्टी संस्थांद्वारे (Third Party Organizations) फिरवले जायचे.
‘सेबी’ची कारवाई:
‘सेबी’ने आपल्या अंतरिम आदेशात (Interim Order) अस्मिता पटेल, त्यांचे पती जितेश जेटलाल पटेल यांच्याबरोबर इतर चार संस्थांना गुंतवणूक सल्ला आणि विश्लेषक सेवा देण्यास मनाई केली आहे. तसेच, या सहाही जणांना सिक्युरिटीज मार्केटमधून (Securities Market) काढून टाकण्यात आले आहे. ‘सेबी’ने अस्मिता पटेल आणि त्यांच्या कंपन्यांकडून संपूर्ण 104 कोटी रुपये जप्त का करू नये, याचे स्पष्टीकरण मागितले आहे. जर त्या उत्तर देऊ शकल्या नाहीत, तर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई केली जाऊ शकते. (SEBI)
इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई:
अलीकडेच, गुंतवणूक शिक्षणाच्या नावाखाली स्टॉक टिप्स देणाऱ्या अशा फिनइन्फ्लुएन्सर्सवर (Fininfluencers) ‘सेबी’ने कठोर कारवाई केली आहे. डिसेंबरमध्ये ‘बाप ऑफ चार्ट’ (Baap of Chart) म्हणून प्रसिद्ध असलेल्या नसिरुद्दीन अन्सारीविरुद्धही (Nasiruddin Ansari) कारवाई करण्यात आली होती. (SEBI)
Title : SEBI Takes Action Against Option Queen Asmita Patel Seizes 104 Crore Earned Through Stock Market Tips






