Children Screen Time | सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल, टॅबलेट आणि टीव्ही यांचा वापर मुलांमध्ये झपाट्याने वाढत आहे. मात्र या वाढत्या स्क्रीन वापरामुळे मुलांच्या मानसिक आणि वर्तनात्मक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मुलांमध्ये चिडचिड, आक्रमकता आणि लक्ष केंद्रित न होण्याच्या समस्या वाढताना दिसत असल्याने पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्क्रीन टाइमचा मेंदू आणि वर्तणुकीवर परिणाम :
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुलांचा वाढता स्क्रीन टाइम त्यांच्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर थेट परिणाम करतो. मोबाईल किंवा इतर डिजिटल माध्यमांवरील कंटेंट मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टीम’ला वारंवार सक्रिय ठेवतो. त्यामुळे डोपामाइनचे प्रमाण वाढते आणि मुलांना सतत उत्तेजन देणाऱ्या गोष्टींची सवय लागते. परिणामी त्यांची सहनशीलता कमी होऊन चिडचिड किंवा आक्रमक वर्तन वाढू शकते.
मात्र यामुळे आता दर महिन्याला साधारण ४ ते १४ वर्षे वयोगटातील ८ ते १० मुलांमध्ये अशा समस्या दिसून येतात. यात आक्रमकपणा, सतत चिडचिड होणे, झोपेच्या अडचणी, एकाग्रतेचा अभाव आणि एकटेपणा जाणवणे यांसारख्या तक्रारी आढळतात. शारीरिक हालचालींची कमतरता आणि डिजिटल साधनांचा वाढता वापर हे यामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Children Screen Time | पालकांनी घ्यावयाची काळजी आणि तज्ज्ञांचा सल्ला :
तज्ज्ञांच्या मते, स्क्रीनचा जास्त वापर केल्यास मुलांची भावना नियंत्रित करण्याची क्षमता कमी होऊ शकते. यामुळे मुलांमधील संवाद कमी होऊन भाषिक विकासालाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सायबरबुलिंग किंवा चुकीचा ऑनलाइन कंटेंट पाहिल्याने मुलांच्या आत्मविश्वासावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे आणि कुटुंबातील तणाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र वेळेत योग्य समुपदेशन आणि उपचार मिळाल्यास मुलांच्या वागणुकीत सुधारणा होऊ शकते.
दरम्यान, तत्ज्ञांच्या मते, वाढत्या स्क्रीन टाइममुळे अनेक मुले कुटुंबापासून दूर राहू लागतात, अभ्यासात मागे पडतात आणि गॅजेट्स काढून घेतल्यावर तीव्र राग व्यक्त करतात. त्यामुळे पालकांनी दोन वर्षांखालील मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवणे, मोठ्या मुलांचा स्क्रीन टाइम दिवसाला दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवणे आणि दररोज किमान ४५ मिनिटे मैदानी खेळ किंवा व्यायामासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.






