SBI YONO | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बँकेच्या YONO (You Only Need One) अॅपचा वापर करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत असून आता या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या पुढील आवृत्तीवरही काम सुरू झाले आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
YONO 2.0 ला मोठा प्रतिसाद :
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) चे अध्यक्ष चेल्ला श्रीनिवासुलु शेट्टी (Chella Srinivasulu Setty) यांनी सांगितले की, डिसेंबर 2025 मध्ये YONO 2.0 चे नवीन व्हर्जन सादर करण्यात आले होते. या सुधारित प्लॅटफॉर्मला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जून 2026 च्या सुरुवातीपर्यंत या अॅपशी सुमारे 4.5 कोटी ग्राहक जोडले गेले असून महिनाअखेर हा आकडा 5 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
त्यांच्या मते, YONO हे केवळ मोबाईल बँकिंग अॅप नसून विविध आर्थिक आणि डिजिटल सेवांचा व्यापक प्लॅटफॉर्म बनला आहे. YONO 2.0 लाँच झाल्यानंतर अवघ्या 100 दिवसांत पुढील आवृत्तीची तयारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ एसबीआयच्या ग्राहकांनाच नव्हे तर इतर बँकांनाही मिळू शकतो. बँकेने ही प्रणाली इतर वित्तीय संस्थांसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला असून ती फिनटेक सेवा पुरवठादाराप्रमाणे कार्य करेल.
SBI YONO | YONO 3.0 ची तयारी आणि वाढणाऱ्या सुविधा :
शेट्टी यांनी स्पष्ट केले की, YONO 2.0 हे जुन्या आवृत्तीचे केवळ अपग्रेड नसून पूर्णपणे नव्याने विकसित केलेले अॅप आहे. नेट बँकिंग आणि YONO शाखा पोर्टलमधील विविध सुविधा एकत्र करून अधिक सक्षम स्वरूपात ते सादर करण्यात आले. ग्राहकांना अधिक चांगला अनुभव आणि सेवा देण्याच्या उद्देशाने हे व्हर्जन तयार करण्यात आले असून आता YONO 3.0 वरही वेगाने काम सुरू आहे.
सध्या या अॅपवर दररोज जवळपास 2 कोटी ग्राहक लॉगिन करत असल्याची माहिती देण्यात आली. डिजिटल बँकिंग अधिक सक्षम करण्यासाठी YONO 3.0 मध्ये अनेक नवीन सुविधा आणि सुधारणा असतील. सध्या YONO द्वारे फंड ट्रान्सफर, कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढणे, वीज, पाणी, गॅस आणि मोबाईल बिल भरणे, विविध कर्जांसाठी अर्ज करणे, विमा खरेदी, गुंतवणूक, एफडी, आरडी, म्युच्युअल फंड, कर भरणे तसेच हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगसारख्या सेवा उपलब्ध आहेत. आगामी आवृत्तीत या सर्व सेवांना अधिक आधुनिक आणि वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर बनवण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.






