Saptashrungi Temple | नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या काळात सप्तश्रृंगी देवीचे मंदिर तब्बल 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना अखंड दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
यंदा चैत्र नवरात्रोत्सव गुढीपाडव्यापासून म्हणजेच 19 मार्चपासून सुरू होणार असून 27 मार्च रोजी रामनवमीपर्यंत हा उत्सव चालणार आहे. या नऊ दिवसांच्या कालावधीत भाविकांना दिवसरात्र देवीचे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंदिर ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नवरात्रोत्सवात मंदिर 24 तास खुले :
मंदिर प्रशासनाच्या नियोजन बैठकीत नवरात्रोत्सव काळात मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने दर्शन व्यवस्थेसह सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचे नियोजन केले आहे.
याशिवाय गडावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खासगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी आपली वाहने नांदुरी येथे पार्क करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. तेथून पुढे भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
Saptashrungi Temple | सुरक्षा आणि शिस्तीसाठी कडक उपाय :
नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष खबरदारी घेतली जात आहे. मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन सज्ज राहणार आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला किंवा गैरवर्तन झाल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यंदाच्या चैत्र नवरात्रोत्सवात भाविकांना अधिक सुकर आणि सुरक्षित दर्शनाची व्यवस्था मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.






