Santosh Deshmukh murder | मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder) यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही या आंदोलनात सहभागी झाले असून, त्यांच्या आईने भावनिक आक्रोश करत पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे.
“पोलिसांना तीन महिने का लागतात?”
संतोष देशमुख यांच्या मातोश्रींनी आपल्या दु:खातून संतप्त प्रतिक्रिया दिली. “माझ्या लेकराला तीन तासांत संपवले, पण पोलिसांना तीन महिन्यातही आरोपी सापडत नाहीत? शेवटी आम्हालाच संपवून टाका!” अशा शब्दांत त्यांनी आपली वेदना व्यक्त केली.
त्यांचा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थांचे डोळेही पाणावले. पोलिसांवर विश्वास ठेवूनही न्याय मिळत नाही, असे सांगत “त्या पोलिसांना माझ्यासमोर आणा, मीच त्यांना शिक्षा करेन!” असा संताप त्यांनी व्यक्त केला. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) यांनी ठाम भूमिका घेत “न्याय मिळेपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाही,” असे सांगितले.
त्यांची कन्या वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिनेही या लढ्यात सहभागी होत “आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत.” असे सांगितले. तर, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी “आजपासून अन्न आणि पाणी दोन्ही त्यागतो,” अशी घोषणा करत भावनिक उद्रेक केला.
“७७ दिवस झाले तरी आरोपी मोकाट, आम्हाला न्याय द्या”
संतोष देशमुख यांच्या आईने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले, “७७ दिवस झाले तरी आरोपी मोकाट आहेत. आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय द्या! सर्व आरोपींना अटक करा आणि कठोर शिक्षा द्या.”
त्या पुढे म्हणाल्या, “पोलिसांवर विश्वास होता, पण त्यांनी विश्वासघात केला. आरोपींना माझ्यासमोर शिक्षा झाली पाहिजे. ज्यांनी गुन्हेगारांना मदत केली, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.” गावकऱ्यांच्या वाढत्या रोषामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
Title : Santosh Deshmukh Murder Villagers Start Hunger Strike Demanding Justice






