Santosh Bangar | राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला उधाण आले असताना, शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी आरोग्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सर्वात चांगले मंत्री असल्याचे मतही त्यांनी मांडले.
म्हणूनच, कोकाटे यांच्यावर वाद निर्माण झाला असला तरी, त्यांचा व्हिडिओ खोटा आणि क्रॉप केल्याचा दावा करत संतोष बांगर यांनी त्यांचे समर्थन केले आहे. हे विधान सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
कोकाटेंवरून राजकीय हलचल, पण बांगरांचा पाठिंबा ठाम :
माहितीनुसार, माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांच्याकडून कृषि खातं काढले जाण्याची शक्यता असून, त्यांचा राजीनामाही होऊ शकतो, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, संतोष बांगर (Santosh Bangar) म्हणाले, “कोकाटे रमी खेळत नव्हते, व्हिडिओ क्रॉप आहे. आजकाल कोणाचंही मुंडकं कोणावरही लावलं जातंय. लोकांनी अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये.”
त्यांनी कोकाटे यांचे कौतुक करताना म्हटले की, “कोकाटे साहेब सर्वात चांगले मंत्री आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.”
Santosh Bangar | माझंही मंत्री होण्याचं स्वप्न आहे – संतोष बांगर :
संतोष बांगर यांनी स्पष्ट शब्दांत मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. “मी छोटा कार्यकर्ता असलो, तरी मंत्री झाल्यानंतर कसा मंत्री असावा हे महाराष्ट्राला दाखवून देईन. पक्षाने जबाबदारी दिली, तर आरोग्य विभाग हाताळायला आवडेल,” असे ते म्हणाले.
तसेच, श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर ते 4 ऑगस्ट रोजी कावड यात्रा काढणार असून, एकनाथ शिंदे हे त्या यात्रेला संबोधित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.








