Sanju Samson On Abhishek Sharma | 2026 च्या टी-20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अभिषेक शर्माची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. अशातच क्रिकेटर संजू सॅमसनने अभिषेकविषयी एक पोलखोल केली आहे. टीम इंडियातील खेळाडू अभिषेकवर जळतात, असं संजूने सांगितलं. सध्या संजूचं हे स्टेटमेंट सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरत आहे.
संजू सॅमसनने इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये याविषयी उघडपणे स्टेटमेंट केलं जे चांगलंच चर्चेत आलं आहे. तो म्हणाला की, आजकाल मैदानावर आणि मैदानाबाहेर जिथे पाहावे तिथे चाहते केवळ अभिषेकच्या नावानेच मोठ्याने ओरडत असतात. त्याची ही वेगाने वाढणारी अफाट लोकप्रियता आणि त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून ड्रेसिंग रूममधील इतर सहकाऱ्यांना थोडाफार हेवा वाटायचा.
सगळीकडे केवळ ‘अभिषेक, अभिषेक’ असाच गजर ऐकू येत असल्याने लोकांचे लक्ष फक्त त्याच्यावरच आहे का, असा प्रश्न इतर खेळाडूंना पडायचा. आता तो संघाचा एक मोठा ‘सुपरस्टार’ झाला आहे, असे म्हणत संजूने हसत हसत त्याला “भाऊ, आता तू लग्न करून टाक!” असा मोलाचा सल्लाही दिला.
सॅमसनने त्यांच्या भागीदारीबद्दल बोलताना ती ‘आग आणि बर्फ’ नव्हे तर ‘आग आणि आग’ अशी जोडी असल्याचे सांगितले. कधी अभिषेक मैदानात धडाकेबाज खेळ दाखवतो तर कधी स्वतः तो आक्रमक खेळी करतो, असे त्याने सांगितलं. केरळ आणि पंजाब या दोन भिन्न पार्श्वभूमी असतानाही दोघांमध्ये चांगले समन्वय असल्याने मैदानावर खेळताना एकमेकांना समजून घेणे सोपे जाते, असेही त्याने नमूद केले.
दरम्यान, सॅमसनसोबतच्या भागीदारीबाबत अभिषेक शर्मानेही प्रतिक्रिया दिली. त्याने सॅमसनचे कौतुक करत तो अत्यंत शांत स्वभावाचा, प्रेमळ आणि सहकाऱ्यांची काळजी घेणारा व्यक्ती असल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमधील समन्वय अधिक मजबूत असल्याचे त्याने सांगितलं.
आता आयपीएलमध्ये आमने-सामने
राष्ट्रीय संघात एकत्र खेळणारे हे दोन्ही फलंदाज आता आयपीएल (IPL) स्पर्धेत मात्र प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरतील. अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून खेळतो आणि 2019 पासून तो या संघाचा भाग आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसन यंदा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघात सामील झाला आहे. या आधी तो राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा खेळाडू होता, मात्र यावेळी त्याची खरेदी-विक्री होऊन तो चेन्नईच्या संघात दाखल झाला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये दोघांमधील सामना पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.






