Maharashtra Politics l सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
या नेत्यांमध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख आणि रवी तमनगौडा पाटील यांचा समावेश आहे. यापैकी काहीजण शरद पवार यांच्या गटात होते, काही भाजपमधून बाहेर पडले, तर काही राजकीयदृष्ट्या निष्क्रिय होते. आता हे सर्वजण राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय होत असल्याने जिल्ह्यातील समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात.
चार बैठका, अनेक चर्चा आणि अखेर निर्णय :
या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत मिरज परिसरात अनेक बैठकांचे आयोजन केले होते. आपल्या राजकीय भवितव्यासाठी योग्य पक्ष निवडण्याचा विचार सुरू असताना अखेर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये याचा निश्चितच परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.
रवी तमनगौडा पाटील हे भाजपमधील माजी नेते होते. जतमधून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढत दिली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनीही अजित पवार गटात प्रवेश घेतल्याने भाजपला धक्का बसल्याचं चित्र आहे.
Maharashtra Politics l जिल्ह्यात बदलणार राजकीय समिकरण :
या पाचही नेत्यांचा प्रवेश म्हणजे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यात एकही मोठा नेता अजित पवार यांच्यासोबत गेला नव्हता. आता मात्र चार माजी आमदार आणि अन्य स्थानिक नेत्यांच्या प्रवेशामुळे गटाची ताकद वाढणार आहे.






