Sandeep Kshirsagar | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाला दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी एका आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही, तर सात जणांवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्येचा मास्टरमाइंड म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे. (Sandeep Kshirsagar)
वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा व्यक्ती असून यामुळेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेले ट्वीट सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांचे ट्वीट
“वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसा धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार चा खास आहे त्यामुळे राजीनामा अशक्य..! भले किती ही पुरावे द्या तुम्ही अंजली दमानिया ताई” असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. त्यांचे हे ट्वीट चर्चेत आले आहे.
#वाल्मिक_कराड जसा धनंजय मुंढे चा खास आहे,
तसा धनंजय मुंढे,
देवेंद्र फडणवीस व अजित पवार चा खास आहे
त्यामुळे राजीनामा अशक्य..!
भले किती ही पुरावे द्या तुम्ही @anjali_damania ताई..!@timesnowbatmya@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis— Sandeep Bhaiya (@SRK_Speaks1) January 28, 2025
क्षीरसागर यांच्या या ट्वीटवर पत्रकारांनी पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना प्रश्न केला होता. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय मतभेद अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष होते.
पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया-
पंकजा मुंडे यांनी अत्यंत सावध शब्दांत प्रतिक्रिया देत या वादात न पडण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या – “मी काहीच पाहत नाही. मी फक्त तुमचं ऐकून घेतलं. बाकी मी काय बोलू?” त्यांच्या या विधानामुळे त्या सदर विषयावर जाणीवपूर्वक मौन बाळगत असल्याचे म्हटले जातेय.






