Sana Khan | अभिनेत्री म्हणून मनोरंजन विश्वात ओळख निर्माण केल्यानंतर 2020 मध्ये धर्मासाठी ग्लॅमर इंडस्ट्रीला रामराम ठोकणारी सना खान (Sana Khan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने आपल्या भूतकाळातील आयुष्याबद्दल आणि सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल केलेल्या वक्तव्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जुन्या दिवसांची आठवण काढताना तिला अश्रू अनावर झाले, तसेच तिने काही धक्कादायक विधानेही केली आहेत.
वस्त्रांवर सना खानचे भाष्य
सना खानने रुबीना दिलैकच्या (Rubina Dilaik) पॉडकास्टमध्ये बोलताना आपल्या भूतकाळातील जीवनशैलीवर आणि विशेषतः कपड्यांवरील बदलांवर भाष्य केले. ती म्हणाली, “स्त्री म्हणून सैतानाने मला कधी विवस्त्र केले ते मला कळलेही नाही. मी बॅकलेस आणि शॉर्ट स्कर्ट्समध्ये अचानक दिसू लागले. ते मलाही कळलं नाही.” कॉलेजमध्ये पारंपरिक ड्रेस घालणारी मुलगी ते थेट बॅकलेस कपड्यांमध्ये स्टेजवर येण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला, हे आपल्याही लक्षात आले नसल्याचे तिने सांगितले.
या आठवणी सांगताना सना भावुक झाली होती आणि तिला रडू कोसळले होते. ती पुढे म्हणाली की, सिनेसृष्टीत काम करत असताना मिळणारे नाव आणि प्रसिद्धी असूनही तिला आंतरिक आनंद मिळत नव्हता. याचे कारण शोधताना तिच्या लक्षात आले की, ती करत असलेल्या अनेक गोष्टी इस्लाममध्ये ‘हराम’ (Haram – निषिद्ध) मानल्या जातात. या विचाराने ती अस्वस्थ आणि चिंतेत होती. “मी रोडवर पडलेले असायचे. मी अशा अनेक गोष्टी केल्या होत्या, ज्या धर्मानुसार हराम आहेत,” असे तिने म्हटले.
शोबिज सोडण्याचा निर्णय
आपल्या भूतकाळातील कामांबद्दल आणि जीवनशैलीबद्दल आता लाज वाटत असल्याचेही सनाने सांगितले. सुरुवातीला केवळ पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित केले होते, पण आतून ती आनंदी नव्हती. अखेरीस, आपण करत असलेले काम आपल्या धर्मानुसार योग्य नसल्याच्या जाणिवेमुळे तिने 2020 मध्ये अचानक मनोरंजन विश्व सोडण्याचा निर्णय घेतला आणि याची घोषणा सोशल मीडियावरून केली. (Sana Khan)
गेल्या काही दिवसांपासून सना खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तिने अभिनेत्री संभावना सेठला (Sambhavna Seth) बुरखा घालण्याबाबत काहीतरी म्हटल्याने तिला ट्रोल केले जात होते. मात्र, संभावना सेठने नंतर स्पष्ट केले की, त्यांच्यातील संभाषण हे केवळ विनोदाने सुरू होते आणि त्या चांगल्या मैत्रिणी आहेत. असे असले तरी, सना खान तिच्या स्पष्ट आणि काहीवेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येते आणि वादात सापडते. तिने पॉडकास्टमध्ये केलेल्या ताज्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा तिच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील आयुष्याची चर्चा सुरू झाली आहे.
Title : Sana Khan Discusses her Past Life






