‘…नाहीतर नालायक म्हणतात’; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरेंवर हल्लाबोल

On: June 30, 2026 4:07 PM
Sachin Ahir
---Advertisement---

Sachin Ahir | शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेले आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी पक्षप्रवेशानंतर आणि उपसभापती पदाचा अर्ज भरल्यानंतर आपली पहिली अधिकृत व आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले, तर नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला.

सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

१. “कोळश्यातून हिऱ्याची चमक एकनाथ शिंदेंनी ओळखली”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना सचिन अहिर भावुक आणि तितकेच आक्रमक झाले होते. ते म्हणाले,  “मी एकनाथ शिंदे सरांचा मनापासून आभारी आहे. कोळश्यातून हिऱ्याची चमक दिसते आणि तो हिरा जवळ करण्याची जेव्हा संधी येते, त्यातूनच नवीन विश्व घडतं. शिंदेंनी मला थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा मान देऊन एका तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यालाही मोठ्या पदावर जाता येतं, हे सिद्ध करून दाखवलं आहे.”

एकनाथ शिंदे हे ‘कॉमन मॅन’ (सामान्य माणूस) म्हणून मुख्यमंत्री असताना अत्यंत प्रभावी काम करत आहेत. सरकारमध्ये राहून लोकांची कामे केली पाहिजेत आणि आता मी त्यांच्याच नेतृत्वात विधिमंडळात अधिक ताकदीने काम करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२. उपसभापती पदाच्या परंपरेचा दिला दाखला

१ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या उपसभापती पदाच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी या पदाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख केला. रा. सू. गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या पदाची गरिमा वाढवली आहे, तीच परंपरा आणि आदर मी पुढे कायम ठेवेन, असे ते म्हणाले. तसेच आगामी काळात जिथे शिवसेना शिंदे गट संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत आहे, तिथे आणि विशेषतः ग्रामीण भागात जाऊन पक्ष बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

३. ठाकरे गटाच्या टिकेला सडेतोड उत्तर: “सोबत असलो की चांगले, गेलो की नालायक!”

पक्ष बदलल्यानंतर ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेला त्यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “त्यांच्यासोबत आहोत तोपर्यंत आम्ही खूप चांगले असतो आणि सोबत सोडली की लगेच ‘नालायक’ किंवा ‘स्वार्थी’ ठरवले जातो. ही राजकीय भूमिका अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्यावर होणाऱ्या सर्व टीकेला मी योग्य वेळी, योग्य व्यासपीठावरून सडेतोड उत्तर देईन.”

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी आजवर दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे, याचे साक्षीदार स्वतः एकनाथ शिंदे आहेत. मी विधानसभा, मुंबई महापालिका आणि अगदी पुण्यातील २१ विभागांतील लोकांसाठी काय योगदान दिले आहे, हे तिथल्या जनतेला चांगलेच माहीत आहे.

काही लोकांना असा भ्रम झाला आहे की राजकारणात फक्त ‘आम्हीच’ आहोत, बाकी कोणीच नाही. अशा प्रवृत्तीला जनताच उत्तर देईल, असा थेट टोला त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता लगावला.

News Title: Sachin Ahir First Reaction after Join Eknath Shinde Sena Vidhan Parishad 2026

Join WhatsApp Group

Join Now