Cristiano Ronaldo | फुटबॉल विश्वातील दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. फिफा विश्वचषक 2026 (FIFA World Cup 2026) स्पर्धेनंतर तो पोर्तुगाल (Portugal) संघाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप देऊ शकतो, अशी माहिती त्याची बहीण कटिया एविरो (Katia Aveiro) यांनी दिल्याचे समोर आले आहे. या खुलाशामुळे जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
वर्ल्डकपनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप? :
सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालने क्रोएशिया (Croatia) संघाचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला आहे. आता राउंड ऑफ 16 मध्ये संघाचा सामना स्पेन (Spain) विरुद्ध होणार आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर रोनाल्डोच्या संभाव्य निवृत्तीबाबत आलेल्या माहितीमुळे क्रीडाविश्वात चर्चेला उधाण आले आहे. आपल्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम केले असले तरी रोनाल्डोला अद्याप फुटबॉल विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे हा त्याचा शेवटचा विश्वचषक ठरत असेल, तर पोर्तुगालने विजेतेपद पटकवावे, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
41 वर्षीय रोनाल्डो सध्या अल नासर (Al Nassr FC) क्लबकडून खेळत असून हा त्याचा सहावा फिफा विश्वचषक आहे. क्लब फुटबॉलमध्ये तो पुढेही खेळत राहील, मात्र आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची शक्यता यापूर्वीही व्यक्त केली जात होती. या चर्चेला अधिक बळ देताना कटिया एविरो यांनी एका क्रीडा वाहिनीशी संवाद साधताना, “हा प्रवास सुरू आहे तोपर्यंत त्याचा पूर्ण आनंद घ्या. हा प्रवास लवकरच संपणार असून विश्वासार्ह सूत्रांनुसार हा रोनाल्डोचा ‘लास्ट डान्स’ ठरेल,” असे म्हटले आहे. या स्पर्धेत रोनाल्डोने आतापर्यंत तीन गोल नोंदवले असून उझबेकिस्तान (Uzbekistan) विरुद्ध दोन आणि क्रोएशियाविरुद्ध एक गोल केला आहे.
Cristiano Ronaldo | 2030 विश्वचषकाबाबतही रंगली चर्चा :
यापूर्वी पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेज (Roberto Martínez) यांनी रोनाल्डोच्या तंदुरुस्तीचे कौतुक करत तो 2030 च्या फिफा विश्वचषकातही खेळू शकतो, असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे रोनाल्डोच्या भविष्यासंदर्भात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.
मात्र, पोर्तुगाल फुटबॉल महासंघाचे (Portuguese Football Federation) अध्यक्ष पेड्रो प्रोएन्का (Pedro Proença) यांनी या शक्यतेबाबत वेगळे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, रोनाल्डोने 2030 च्या विश्वचषकात खेळणे हे आश्चर्यकारक ठरेल आणि त्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे आता फिफा विश्वचषक 2026 हीच रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा ठरणार का, याकडे संपूर्ण फुटबॉल विश्वाचे लक्ष लागले आहे.






