Rohit Sharma | भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दमदार शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने केलेल्या शांत आणि वेगळ्या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शतक पूर्ण होताच रोहितची अनोखी प्रतिक्रिया :
लॉर्ड्स (Lord’s) मैदानावर झालेल्या तिसऱ्या वनडेत इंग्लंडने भारतासमोर 388 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अप्रतिम फलंदाजी करत 138 धावांची खेळी साकारली. त्याच्या या डावात 17 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. अलीकडील खराब फॉर्ममुळे हा सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा ठरू शकतो आणि तो निवृत्तीची घोषणा करेल, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र रोहितने शतकी खेळी करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
This is the first time ig Rohit Sharma has given flying kiss to Ritika while batting. This innings was so emotional for him 😭❤️ pic.twitter.com/UG0HO4Eb0F
— Kusha Sharma (@Kushacritic) July 19, 2026
आदिल रशीद (Adil Rashid) याच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत रोहितने शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे शतकानंतर त्याने हेल्मेट काढले नाही, उडी मारली नाही किंवा आक्रमक जल्लोषही केला नाही. त्याने फक्त बॅट उंचावत प्रेक्षकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. त्यानंतर मैदानातून पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिला फ्लाइंग किस दिला. स्टेडियममध्ये उपस्थित रितिकाच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचेही पाहायला मिळाले. रोहितच्या या साध्या पण भावनिक सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.
Rohit Sharma | शतक व्यर्थ; भारताने मालिका गमावली :
रोहितची अविस्मरणीय खेळी असूनही भारताला विजय मिळवता आला नाही. 388 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 7 बाद 360 धावांपर्यंत मजल मारली आणि 27 धावांनी सामना गमावला. रोहितनंतर शुभमन गिल (Shubman Gill) याने 77 धावा केल्या, तर विराट कोहली (Virat Kohli) याने 60 चेंडूत 74 धावांची खेळी केली. त्याच्या डावात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
या पराभवासह भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 अशा फरकाने गमावली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, मात्र त्यानंतर इंग्लंडने सलग दुसरा आणि तिसरा सामना जिंकत मालिका आपल्या नावावर केली. रोहितच्या शानदार शतकामुळे चाहत्यांना आनंद मिळाला असला, तरी संघाला विजय मिळवून देण्यात ते अपुरे ठरले.






