Sinhagad Fort | पुणे (Pune) जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले सिंहगड (Sinhagad Fort) येथे मुसळधार पावसामुळे पायरीमार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनाने पर्यटकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा वाढता जोर आणि निसरडी वाट लक्षात घेता सिंहगडावर जाण्यापूर्वी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पहिल्या दरवाज्याजवळ दरड कोसळली :
प्राथमिक माहितीनुसार, सिंहगडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ अचानक दरड कोसळली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग खचला आणि मोठे दगड थेट पायरीमार्गावर येऊन पडले. त्यामुळे पर्यटकांच्या ये-जा मार्गावर अडथळा निर्माण झाला असून संबंधित परिसरात धोका वाढल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या संपूर्ण पुणे जिल्हा आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सिंहगडावरही सतत पाऊस पडत असल्याने दाट धुके, निसरडे रस्ते आणि दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर गडावर येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Sinhagad Fort | विकेंडला जाणाऱ्यांनी घ्यावी विशेष खबरदारी :
पावसाळ्याच्या काळात विशेषतः वीकेंडच्या दिवशी सिंहगडावर हजारो पर्यटक भेट देतात. अशा परिस्थितीत दरड कोसळल्याच्या घटनेमुळे पुढील काही दिवस सिंहगडावर जाण्याचा विचार करणाऱ्यांनी परिस्थितीची माहिती घेऊनच प्रवास करावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. आवश्यक नसल्यास गडावरील भेट पुढे ढकलण्याचाही पर्याय पर्यटकांनी विचारात घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. प्रशासनाकडून पायरीमार्गावर पडलेले दगड हटवण्याचे काम सुरू असून मार्ग सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, हवामानातील बदल लक्षात घेऊन पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही जोखीम टाळावी, असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.






