‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; ठेवीदारांना झटका

On: February 14, 2025 12:05 PM
RBI Cheque New Rule
---Advertisement---

RBI Restrictions | रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (New India Co-Operative Bank) बचत, चालू किंवा इतर कोणत्याही ठेव खात्यातून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. तसेच, बँकेला नवीन कर्ज देण्यास किंवा ठेवी स्वीकारण्याची परवानगी मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँकेबाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हे निर्बंध १३ फेब्रुवारी २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू असतील.

बँकेवर कारवाई का झाली?

बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे आरबीआयने (RBI) हे निर्बंध लादले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बँक सातत्याने तोट्यात चालली होती. मार्च २०२४ मध्ये बँकेला २२.७८ कोटी रुपयांचा तोटा झाला, जो २०२३ मध्ये ३०.७५ कोटी रुपये होता.

बँकेची ढासळती स्थिती पाहता ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत आणि बँकेवर आणखी आर्थिक दबाव येऊ नये यासाठी आरबीआयला हे पाऊल उचलावे लागले. मात्र, बँकेचा परवाना अद्याप रद्द करण्यात आलेला नसून, त्याच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. (RBI Restrictions)

ज्यांचे पैसे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा असतील, तर घाबरून जाण्याची गरज नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत प्रत्येक खातेदाराला पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळणार आहे. म्हणजेच, जर बँकेची अवस्था बिकट असेल आणि ती बंद करावी लागली, तर प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त ५ लाख रुपये परत मिळतील. पण जर तुमच्या बँक खात्यात जास्त पैसे जमा झाले असतील, तर सध्या तुम्हाला बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची किंवा तोडगा निघण्याची वाट पाहावी लागणार आहे.

बँकेवरील निर्बंध

बँक नवीन कर्ज देऊ शकणार नाही आणि जुन्या कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही.
ग्राहकांना नवीन फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा अन्य कोणतीही फिक्स्ड डिपॉझिट स्कीम उघडता येणार नाही.
बँक कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकत नाही आणि कोणालाही पैसे देऊ शकणार नाही.
बँक आपली मालमत्ता विकून पैसा उभा करण्याचा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.

पुढे काय?

आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, हे निर्बंध सध्या ६ महिन्यांसाठी लागू असतील, परंतु जर बँकेच्या स्थितीत सुधारणा झाली नाही, तर त्यात आणखी वाढ होऊ शकते. (RBI Restrictions)

Title : RBI Restrictions New India Co-Operative Bank 

 

Join WhatsApp Group

Join Now