RBI Repo Rate | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) येत्या एप्रिल महिन्यात कर्जदारांसाठी मोठी खुशखबर देऊ शकते. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर घटल्याने, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो रेट कपातीचा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (RBI Repo Rate)
महागाई दर घटल्याने रेपो रेट कपातीची शक्यता
फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर घटून 3.61 टक्क्यांवर आला आहे, जो जानेवारीमध्ये 4.3 टक्के होता. सांख्यिकी मंत्रालयाने 12 मार्चला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, हा महागाई दर आरबीआयच्या लक्ष्यित 4 टक्क्यांपेक्षा कमी आहे. खाद्य पदार्थांच्या महागाई दरातही मोठी घट झाली असून तो 5.97 टक्क्यांवरून 3.75 टक्क्यांवर आला आहे. विशेषतः भाजीपाल्याच्या किमती घसरल्याने एकूण महागाई दर कमी झाला आहे.
महागाई दर घटल्याने आरबीआय पतधोरणात सुलभता आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 ते 9 एप्रिल दरम्यान होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट कपातीचा निर्णय होऊ शकतो. कर्जदारांना यामुळे ईएमआयमध्ये दिलासा मिळू शकतो.
मागील पतधोरण आणि आगामी संभाव्यता
7 फेब्रुवारीला झालेल्या पतधोरण बैठकीत आरबीआयने रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आणला होता. आता नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरबीआयच्या मते, खाद्य पदार्थांच्या किंमती कमी झाल्याने अर्थव्यवस्थेतील पुरवठा आणि मागणी यांचा समतोल राखता येईल. रब्बी हंगामातील चांगल्या उत्पादनामुळे महागाई आणखी घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत पतधोरण आणखी शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (RBI Repo Rate)
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेपो रेट आणखी किती टक्क्यांनी कमी होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Title : RBI Repo Rate May Cut in April






