RBI Repo Rate Hike | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरण निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. MPC ने रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 5.25 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर पोहोचला असून, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
रेपो दर वाढीमागे नेमकी कारणे काय? :
रिझर्व्ह बँकेच्या MPC समितीने आज झालेल्या बैठकीत रेपो रेट वाढवण्याचा एकमताने निर्णय घेतला. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली वाढ आणि भारतीय रुपयाच्या मूल्यावर निर्माण झालेला दबाव या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ झाल्यानंतर तो आता 5.50 टक्के झाला आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी 2023 नंतर सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर आरबीआयने प्रथमच रेपो दर वाढवला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस एमपीसीची बैठक झाली. बैठकीनंतर दरवाढीची अधिकृत घोषणा करण्यात आली. रेपो दरासोबतच स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) दर 5.25 टक्के झाला आहे. दुसरीकडे, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि बँक रेट 5.75 टक्क्यांवर पोहोचले आहेत. मात्र, एमपीसीने भविष्यातील निर्णयांसाठी आपली भूमिका ‘तटस्थ’ म्हणजेच Neutral ठेवली आहे. त्यामुळे पुढील काळातील व्याजदरांबाबत बाजाराला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
RBI Repo Rate Hike | गृहकर्जाच्या EMI वर किती परिणाम होणार? :
रेपो दर वाढल्यामुळे फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलेल्या ग्राहकांना त्याचा परिणाम जाणवू शकतो. विशेषतः गृहकर्ज, कार लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
मात्र, आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर प्रत्येक बँकेकडून त्याच दिवशी EMI वाढवली जातेच असे नाही. संबंधित बँकेचा लेंडिंग रेट, कर्जाच्या व्याजदराची रचना आणि रीसेट सायकल यावर प्रत्यक्ष परिणाम कधी आणि किती होईल हे ठरते.









