‘ते लोक कपडे बघून लोकांना…’; दीनानाथ हॉस्पिटलवर रविंद्र धंगेकरांचे गंभीर आरोप

On: April 8, 2025 7:07 PM
Ravindra Dhangekar , Deenanath Hospital
---Advertisement---

Dinanath Hospital Pune | पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गर्भवती तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासनाच्या चौकशी समितीने रुग्णालयावर ठपका ठेवल्यानंतर, आता शिवसेना (उबाठा) नेते रवींद्र धंगेकर (Shiv Sena (UBT) leader Ravindra Dhangekar) यांनी रुग्णालय प्रशासनावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघून प्रवेश दिला जातो, तसेच रुग्णालयाने कोट्यवधी रुपयांचा कर थकवला आहे आणि दंडही भरलेला नाही, असा दावा धंगेकर यांनी केला आहे.

थकीत कर आणि दंडाचा बोजा

रवींद्र धंगेकर यांनी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “मंगेशकर परिवाराचे योगदान या देशासाठी महत्त्वाचे आहे. पण मंगेशकर परिवार आणि हॉस्पिटल हा भाग वेगळा आहे.” रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी दावा केला की, “दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघूनच आतमध्ये प्रवेश दिला जातो.” त्यांच्या मते, रुग्णालयाचे संचालक हे राजकीय पाठबळामुळे (Political Support) मालकाच्या थाटात वावरतात आणि आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशा अविर्भावात असतात.

धंगेकर यांनी रुग्णालयाच्या आर्थिक व्यवहारांवरही गंभीर आरोप केले. “मंगेशकर कुटुंबियाच्या नावाने सरकारने हॉस्पिटलला करोडो रुपयाची जागा मोफत दिली आहे. महानगरपालिकेचा (PMC) २७ कोटी रुपयांचा टॅक्स बाकी आहे. त्यांना शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड झालेला आहे, तो देखील त्यांनी भरलेला नाही. हे सगळं कोणाच्या जिवावर चालते? यांच्या पाठीशी कोण आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

धंगेकरांची मोठी मागणी

धंगेकर पुढे म्हणाले की, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात लाखो पेशंट येत असतात. त्या पेशंटला कशा पद्धतीने ट्रीट केले जाते? हे आपण बघितले आहे.” त्यांच्या मते, रुग्णालयात नियमांचे पालन केले जात नाही आणि तिथे केवळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला जातो, ज्यामुळे रुग्णांना कोणताही दिलासा मिळत नाही. त्यामुळे, “शासनाने हे रुग्णालय ताब्यात घेतले पाहिजे आणि यावर प्रशासक नेमला पाहिजे,” अशी थेट मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

“याआधी देखील रुग्णालयावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर दंड आकारला आहे. मात्र रुग्णालयाने दंड भरलेला नाही. ते मनमानी कारभार करतात. जो पर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत यावर काही बोलता येणार नाही,” असे म्हणत त्यांनी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली. राज्य सरकारने या हॉस्पिटलला अनेक सुविधा दिल्या असूनही, हॉस्पिटलने कोट्यवधी रुपयांचा कर थकवल्याचा आरोपही त्यांनी केला. धंगेकरांच्या या आरोपांमुळे दीनानाथ रुग्णालय प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

News Title – Ravindra Dhangekar Slams Dinanath Hospital Pune Allegations

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now