Ratnagiri News | रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी नदीत उतरलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
खेड शहर आणि भोस्ते गावाच्या सीमेवर वाहणाऱ्या जगबुडी नदीतील एका खोल डोहात हे चार तरुण अंघोळीसाठी गेले होते. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने चौघेही अचानक पाण्यात बुडू लागले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरड केली, मात्र खोल पाणी आणि वेगवान प्रवाहामुळे तिघांना बाहेर पडता आले नाही.
एकाचा जीव वाचला, तिघांवर काळाचा घाला :
या दुर्घटनेत एका तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र इतर तिघे पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलांना गमावलेल्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ratnagiri News | डोह आणि नदी परिसरात वाढता धोका :
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात तसेच उन्हाळ्यात नदी, धरणे आणि डोहांमध्ये पोहण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी होत असते. मात्र पाण्याची खोली, भोवरे किंवा प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने अनेकदा अशा दुर्घटना घडतात. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही अनेकजण धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरतात आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
जगबुडी नदीतील या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पाणीसाठ्यांजवळ सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तीन तरुणांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण खेड तालुका या घटनेने हादरून गेला आहे.






