Ram Shinde l कर्जत नगरपंचायतीच्या सत्तेत मोठा भूकंप घडवण्यासाठी विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे (Ram shinde) यांनी अचूक वेळ साधत एकच डाव टाकला आणि त्यात यशही मिळवलं. नगराध्यक्षांना हटविण्याच्या नियमात बदल होताच काही तासांतच नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस आघाडीच्या सत्तेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगळवारी (ता. 15) मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर फक्त काही तासांत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल होणे ही ‘पूर्वनियोजित खेळी’ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या खेळामागे राम शिंदेंचा राजकीय मास्टरस्ट्रोक असल्याचं स्पष्टपणे जाणवतंय.
कायद्यात बदल आणि लगेच प्रस्ताव :
उषा राऊत यांच्याविरोधात 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. यात राष्ट्रवादी (शरद गट) चे 8, काँग्रेसचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवक सामील आहेत. यापूर्वी नगराध्यक्षांना हटवण्यासाठी शासनाची परवानगी लागायची, मात्र नवीन कायद्यानुसार दोन तृतीयांश सदस्यांचा प्रस्ताव पुरेसा ठरणार आहे.
नवीन नियमाची अंमलबजावणी होण्याआधीच कर्जतमध्ये यासाठी तयारी सुरू होती, पण कायद्यात अडथळा होता. आता तो अडथळा दूर होताच लगेच ठराव दाखल झाल्याने ही घडामोड संपूर्णपणे नियोजनबद्ध असल्याचे चित्र उभे राहिले आहे.
राम शिंदेंच्या ‘द्विट’ने उघडलं राजकारणाचं गुपित? :
मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर अनेक मंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या, मात्र राम शिंदेंनी (Ram shinde) फक्त नगराध्यक्ष बाबतचा निर्णयच ट्विट केला. त्यांचा हा 15 दिवसांतील एकमेव ट्विट असल्याने या प्रकरणामागे त्यांची भूमिका असल्याचं राजकीय वर्तुळात उघडपणे बोललं जातंय.
त्याचवेळी, अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या नगरसेवकांपर्यंत अध्यादेश इतक्या पटकन कसा पोहोचला? यावरही अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे ही संपूर्ण घटना रोहित पवार यांचं राजकीय बालेकिल्ला असलेल्या कर्जत नगरपंचायतीत सत्ता उलथवण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.
पुढील 10 दिवसांत निर्णायक सभा :
नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून 10 दिवसांच्या आत विशेष सभा आयोजित करून मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये उषा राऊत यांची नगराध्यक्षपदावरून गच्छंती होणार का, हे स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे – कर्जतच्या राजकारणात राम शिंदेंनी (Ram shinde) चाल टाकली आणि रोहित पवार यांना थेट आव्हान दिलं.






