Rajya Sabha Election | राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील सात जागांवरही मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा खासदार होणार का, याची चर्चा रंगली आहे. अर्ज प्रक्रिया आणि मतदानाच्या तारखांमुळे राजकीय गणित मांडले जात आहे.
निवडणूक कार्यक्रम आणि निवृत्तीची तारीख
Rajya Sabha Election | निवडणूक आयोगाने (Election Commission of India) 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी करत राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. 5 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. 6 मार्चला अर्जांची छाननी होईल, तर 9 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार असून, सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी होईल. संपूर्ण प्रक्रिया 20 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे.
महाराष्ट्रातील सात जागांसह पश्चिम बंगाल (West Bengal) आणि बिहार (Bihar) येथे प्रत्येकी पाच जागांवर, तर तामिळनाडू (Tamil Nadu) मध्ये सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी समाप्त होत आहे. सध्या महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि रामदास आठवले मिळून तीन सदस्य आहेत.
Rajya Sabha Election | महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे :
2024 मधील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचे स्पष्ट बहुमत आहे. भाजपला 131, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या पक्षाला 40 आमदार मिळून एकूण 228 सदस्य आहेत. अपक्षांच्या पाठिंब्यामुळे महायुतीकडून सहा उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते. या सहा जागांमध्ये भाजपचे चार, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. उर्वरित एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाईल, असे संकेत आहेत.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अलीकडील पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी शरद पवार यांच्या नावाचे संकेत दिले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. 85 वर्षांचे शरद पवार यांनी पूर्वी राज्यसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते. पाच दशकांहून अधिक राजकीय कारकिर्दीत त्यांनी 14 निवडणुका लढवल्या असून एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट वेगवेगळ्या राजकीय दिशांना असल्याचे चित्र आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी आहे, तर शरद पवार गट विरोधात आहे. विद्यमान राजकीय परिस्थितीत भाजपसोबत जाण्याची शक्यता कमी मानली जाते. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना राज्यसभेत पाठवण्याबाबत चर्चा सुरू आहे. 2 मार्चपर्यंत त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






