Rajan Vichare Letter | शिवसेना (ठाकरे गट) खासदार राजन विचारे (Rajan Vichare Letter) यांनी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांना उद्देशून लिहिलेलं जाहीर पत्र सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे. काही दिवसांपूर्वी सरनाईक यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राजन विचारे यांनी त्यांचा राजकीय आणि वैयक्तिक इतिहास उघडपणे मांडला आहे.
या पत्रात राजन विचारे (Rajan Vichare Letter) यांनी सरनाईक यांच्या पक्षांतराची, घड्याळांची भेटवस्तू, घोटाळ्यांच्या चौकश्या, आणि पक्षाशी गद्दारी या मुद्द्यांवर सडकून टीका केली आहे. “तुमचे धंदे मी जवळून पाहिले आहेत,” असे म्हणत त्यांनी सरनाईक यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
“रत्नजडित घड्याळं देऊन सलगी वाढवलीत” :
राजन विचारे यांनी म्हटले आहे की, प्रताप सरनाईक यांचा जन्म डोंबिवलीत सामान्य घरात झाला, काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केली, नंतर राष्ट्रवादी आणि शेवटी शिवसेनेत प्रवेश केला. प्रत्येक पक्षात वरिष्ठांशी जवळीक साधण्यासाठी सरनाईक यांनी रत्नजडित घड्याळं भेट देण्याचा मार्ग अवलंबला, असा आरोपही पत्रात आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, “तुम्ही तुमचं कुटुंबही राजकारणात उतरवलं. पण आता ज्यांच्याजवळ बसता, तेच काही महिन्यांपूर्वी तुमच्या मागे लागले होते. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं, पण तुम्ही शेवटी गद्दारी केली.”
Rajan Vichare Letter | “घोटाळे, चौकशी आणि ईडीचा ससेमिरा” :
राजन विचारे यांनी प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांच्यावर एमएमआरडीएतील सिक्युरिटी घोटाळा, एमएसईआयएल जमीन घोटाळा, लोकायुक्त चौकशी, आणि ईडीच्या कारवायांचा उल्लेख करत सरळसरळ आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत.
“तुमच्या त्याच नगरविकास खात्याने तुमच्यावर चौकशीचे आदेश दिले होते. हे सर्व सामान्य जनतेलाही ठाऊक आहे. तुम्हाला निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान केले होते, ते विसरू नका. घरातील लोकांनाच विचारून बघा की, कोण त्रास देत होतं,” असा सल्लाही त्यांनी दिला. (Rajan Vichare Letter)
“भूतकाळ विसरू नका, तोच भविष्यात साथ देतो” :
पत्राच्या शेवटी राजन विचारे यांनी “भूतकाळः न विस्मर्तव्यः” हा श्लोक उद्धृत करत सरनाईक यांना टोला लगावला. “ज्यांनी मोठं केलं, त्यांनाच विसरणं हे राजकारणात चुकतं. जेव्हा विरोध होता, तेव्हा उद्धवजींनीच तुम्हाला उमेदवारी दिली. त्या कृतज्ञतेचा विसर कसा पडतो?” असा सवाल विचारे यांनी केला.
या पत्रामुळे ठाण्यातील शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राजन विचारेंनी अगदी वैयक्तिक इतिहास उलगडत सरनाईक यांना थेट आव्हान दिल्यामुळे याचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे.






