पुढील २४ तास महत्त्वाचे! महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचे सावट

On: March 14, 2026 12:12 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Weather Alert | महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत असताना हवामानात अचानक बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 14 मार्च रोजी राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेसोबतच वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) 11 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा दिला आहे. विशेषतः शाळकरी मुले, बाहेर काम करणारे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात दमट वातावरण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता :

कोकण पट्ट्यातील (Konkan) हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad) आणि पालघर (Palghar) या जिल्ह्यांमध्ये दिवसभर उकाडा आणि आर्द्रता जाणवण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत या भागात विशेष पावसाची शक्यता नसून वातावरण प्रामुख्याने कोरडे राहू शकते. तापमान साधारण 31 ते 34 अंश सेल्सियसदरम्यान राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट उन्हात जाणे टाळावे तसेच शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) हवामानाचा वेगळाच चित्र दिसण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे (Pune) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याच कारणामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Alert | विदर्भ-मराठवाड्यात पावसाची चिन्हे, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा जोर :

उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मात्र सध्या उन्हाची तीव्रता कायम आहे. नाशिक (Nashik), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यांमध्ये तापमान 37 ते 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास नागरिकांना जाणवू शकतो. मात्र 15 मार्चपासून या भागात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून वातावरणात काही प्रमाणात बदल होऊ शकतो.

मराठवाडा (Marathwada) भागातही उष्णतेचा प्रभाव कमी होत असताना काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) येथे वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो, तर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जालना (Jalna) या भागांमध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागातील तापमान 36 ते 39 अंश सेल्सियसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भात (Vidarbha) सध्या उन्हाचा कडाका जाणवत असला तरी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. गडचिरोली (Gadchiroli), गोंदिया (Gondia) आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागपूर (Nagpur) परिसरात सध्या मोठा इशारा नसला तरी 15 मार्चपासून संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. येथे तापमान 38 ते 41 अंश सेल्सियस दरम्यान राहू शकते.

दरम्यान, हवामान खात्याने नागरिकांसोबतच शेतकऱ्यांनाही सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कडक उन्हात दीर्घकाळ बाहेर काम टाळावे, पुरेसे पाणी पावे आणि लहान मुले तसेच वृद्धांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही सांगण्यात आले आहे.

News title : Rain Alert in Maharashtra Districts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now