Railway Job | रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना थेट गुणवत्ता यादीच्या आधारे संधी मिळणार आहे.
परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरीची संधी
एसईसीआर (SECR) रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), बिलासपूर (Bilaspur) यांनी १,१९१ ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्ता यादीवर केली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार नाही. १२ मे २०२६ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ११ जून २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
गुणवत्ता यादी तयार करताना उमेदवारांच्या दहावीतील किमान ५० टक्के गुण आणि आयटीआय (ITI) मधील गुणांची सरासरी विचारात घेतली जाणार आहे. या यादीत निवड झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल. रेल्वेच्या वातावरणात प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि तांत्रिक अनुभव मिळवण्यासाठी ही अप्रेंटिसशिप उपयुक्त ठरणार आहे.
अनेक ट्रेडमध्ये रिक्त पदे उपलब्ध
या भरतीमध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), स्टेनोग्राफर (हिंदी/इंग्रजी), डिझेल मेकॅनिक आणि सुतार अशा विविध ट्रेडचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय इतर अनेक तांत्रिक व्यवसायांमध्येही रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. उमेदवार त्यांच्या संबंधित आयटीआय पात्रतेनुसार अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये एनसीव्हीटी (NCVT) किंवा एससीव्हीटी (SCVT) मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्यानंतर secr.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन SECR RRC बिलासपूर अप्रेंटिस भरती २०२६ लिंकद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
News Title: Railway JOb SECR Apprentice Recruitment Online Registration






