Raigad News | उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या रायगड (Raigad) जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले आहेत. महाराष्ट्रभरातून (Maharashtra) पर्यटक मोठ्या संख्येने या किनारपट्टीवर दाखल होत असून, जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजची नोंदणी पूर्णपणे वाढली आहे. या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून, अलिबाग (Alibag) आणि आसपासचे किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत.
राज्यभरातील पर्यटकांची पसंती रायगडला
सध्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने अनेक कुटुंबे आणि पर्यटक निवांत वेळ घालवण्यासाठी घराबाहेर (Raigad News) पडले आहेत. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), नाशिक (Nashik) यांसारख्या प्रमुख शहरांमधून तसेच राज्याच्या इतर भागांतूनही मोठ्या संख्येने पर्यटक रायगडच्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांना भेट देत आहेत. अलिबाग, मुरुड (Murud), दिवेआगर (Diveagar), श्रीवर्धन (Shrivardhan), काशीद (Kashid), नांदगाव (Nandgaon) यांसारखे किनारे पर्यटकांच्या उपस्थितीने गजबजून गेले आहेत. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या किनाऱ्यांवर मोठी गर्दी आणि उत्साह दिसून येत आहे.
वाढत्या पर्यटकांमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारची निवास व्यवस्था, जसे की हॉटेल्स, कॉटेजेस, रिसॉर्ट्स, फार्महाऊस आणि होम-स्टे, जवळपास पूर्णपणे आरक्षित झाली आहेत. किनारपट्टीवर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध उपक्रम उपलब्ध आहेत. अनेक पर्यटक जलक्रीडा (Water Sports), उंट सफारी, घोडागाडी आणि एटीव्ही बाईक राईडचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत.
निवास-मनोरंजन फुल्ल; व्यवसायात तेजी
पर्यटकांच्या या वाढत्या (Raigad News) संख्येचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला होत आहे. खाद्यपदार्थांचे स्टॉल चालवणारे, नारळपाणी विक्रेते, बर्फाचे गोळे विकणारे आणि इतर लहान-मोठे व्यावसायिक यांची चांगली कमाई होत आहे. पर्यटन व्यावसायिक काशीनाथ हर्षे (Kashinath Harshe) यांच्या मते, उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ खूप वाढला असून, सर्व निवास व्यवस्था पूर्ण भरलेल्या आहेत. स्थानिक विक्रेते, जलक्रीडा चालक आणि इतर संबंधित व्यवसायांना यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही, तोपर्यंत पर्यटकांची ही गर्दी कायम राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.






