Raigad News | रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादामुळे भरत गोगावले यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील असा ठाम दावा करत असतानाही, येत्या स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. हा निर्णय मंत्री गोगावले यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांना आणि शिंदे गटाच्या नेत्यांना विश्वास होता की गोगावले यांचीच रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती होईल. त्यांनी वारंवार माध्यमांसमोर रायगडच्या पालकमंत्रिपदावर आपला हक्क असल्याचे सांगितले होते. मात्र, स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी जाहीर झालेली यादी पाहता, त्यांचे हे दावे फोल ठरले आहेत. रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या नावाची निवड झाल्याने गोगावले यांना मोठा धक्का बसला असून, यामुळे शिंदे गटाची जिल्ह्यात पकड कमकुवत झाल्याचे मानले जात आहे.
गोगावले पुन्हा तोंडघशी
स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार याची यादी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे. या यादीमध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असलेले भरत गोगावले यांना वगळण्यात आले आहे. गोगावले यांना कोणत्याच जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी नियुक्त करण्यात आलेले नाही, ही बाब विशेष लक्षवेधी आहे.
भरत गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्री होण्यासाठी अनेकवेळा मागणी केली होती आणि त्यांना शिंदे गटाकडून आश्वासनही मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जाहीर झालेल्या यादीने गोगावलेंच्या आशांना तडा दिला आहे.
Raigad News | गोगावलेंना वगळलं
एकंदरीत, स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर झालेल्या ध्वजारोहणाच्या यादीने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आणखी गुंतागुंतीचा केला आहे. गोगावलेंना यादीतून वगळल्यामुळे शिंदे गटालाही हा एक धक्का मानला जात आहे.
तसेच नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण होणार आहे. त्याचप्रमाणे, एकनाथ शिंदे ठाण्यात, छगन भुजबळ गोंदियात, राधाकृष्ण विखे-पाटील अहमदनगर (अहिल्यानगर) येथे आणि चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये ध्वजारोहण करतील.
या यादीमध्ये पालकमंत्र्यांची त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे.






