Rahul Gandhi | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेवर थेट आकडेवारी, फोटो आणि दस्तऐवज सादर करून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या आरोपांमुळे आता निवडणूक आयोगासह भाजपवरही दबाव वाढलेला दिसतो.
राहुल गांधींनी यापूर्वीही निवडणुकीदरम्यान घोटाळ्याचे आरोप केले होते. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आता थेट पुरावे सादर करत राहुल गांधींनी या वादाला नव्या वळणावर नेले आहे.
राहुल गांधींचे पाच गंभीर आरोप :
संशयास्पद मतदार वाढ :
राहुल गांधींनी पहिला आरोप करताना सांगितले की, “महाराष्ट्रात पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत.” या अनैसर्गिक वाढीमुळे निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण होतो, असे त्यांनी नमूद केले.
एकाच राज्यात वेगळे निकाल का? :
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला विजय मिळाला, पण त्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव का झाला? आणि त्यावेळी एक कोटी नवमतदार कुठून आले? असा गंभीर सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगाचे मौन :
राहुल गांधी म्हणाले की, “या सर्व तक्रारी निवडणूक आयोगाकडे मांडल्यानंतरही त्यावर कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही.” एवढेच नाही, तर डिजिटल स्वरूपातील डेटा मागवूनही तो दिला गेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मतदानाचा संध्याकाळी अचानक वाढलेला टक्का :
विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5:30 नंतर अचानक मतदानाचा टक्का वाढला. यामागे भाजपा आणि निवडणूक आयोगाचे संगनमत असून, मतं चोरली गेली, असा गंभीर आरोप त्यांनी लावला. त्यांनी हेही नमूद केले की, एकाच व्यक्तीने कर्नाटक, महाराष्ट्र आणि यूपीमध्ये मतदान केल्याचे पुरावे सापडले आहेत.
मतदार यादीतील फोटोसंबंधी तक्रारी :
राहुल गांधी यांनी सांगितले की, “अनेक मतदारांच्या फोटोची प्रतिमाच नाही, तर काहींमध्ये फोटो इतके छोटे आहेत की ओळखणं अशक्य आहे.” नवीन मतदारांसाठी फॉर्म 6 चा अवाजवी वापर केला गेला असल्याचाही दावा त्यांनी केला.
Rahul Gandhi | पुढे काय? आयोग आणि भाजपा काय उत्तर देणार? :
राहुल गांधींनी सार्वजनिकरीत्या यावेळी पुरावे सादर केल्यामुळे आता निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आयोगाने या आरोपांवर स्पष्टीकरण दिले नाही, तर राजकीय व सामाजिक वर्तुळात आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
दुसरीकडे, भाजपानेही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसल्याने त्यांच्या उत्तराकडेही देशाचे लक्ष लागून आहे.








