Rana Sanga Controversy | ‘गद्दार’ शब्दावरून महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय वादानंतर आता उत्तर प्रदेशातही तणाव निर्माण झाला आहे. सपा खासदार रामजी लाल सुमन यांनी राज्यसभेत राणा संगा यांना गद्दार म्हटल्यावर त्यांच्या घरावर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि दगडफेक झाल्याने अनेक पोलिस जखमी झाले आहेत.
तोडफोड आणि दगडफेक
सुमन यांनी 21 मार्च रोजी राज्यसभेत केलेल्या वक्तव्यात मुस्लिम समाजाला बाबरचा डीएनए असल्याचे म्हटले होते, आणि त्यानंतर हिंदू समाजात गद्दार म्हणून राणा संगा यांचा उल्लेख केला होता. त्यावर करणी सेनेने आपला विरोध व्यक्त करत आग्रा येथील खासदार रामजी लाल सुमन यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात एक हजारांहून अधिक कार्यकर्ते, बुलडोझर आणि दगड घेऊन आले होते. कार्यकर्त्यांनी खासदारांच्या घराबाहेर ठेवलेल्या 40-50 खुर्च्या फोडल्या, तसेच 10 हून अधिक वाहनांची तोडफोड केली.
पोलिस लाठीचार्ज आणि राजकीय वातावरण तापले!
सुरुवातीला सपा आणि करणी सेनेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले, पण पोलिसांच्या लाठीचार्जनंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कार्यकर्त्यांचा पाठलाग केला, परंतु ते एक्स्प्रेस वेवरून शहरात दाखल झाले.
सुरक्षेच्या दृष्टीने सपा खासदारांच्या सोसायटीचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले. पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या की, कोणीही घराबाहेर पडू नये. या राजकीय तणावात सपा खासदार रामजी लाल सुमन यांनी राज्यसभेत ज्या शब्दात राणा संगा यांना गद्दार म्हटले, त्यावरून समाजातील विविध गटांत तणाव निर्माण झाला आहे.






