Pune Traffic News | पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनेक गतिरोधक तात्पुरते हटवण्यात आले होते. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर वाहनांचा वेग वाढल्याने अपघातांचा धोका वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. याची दखल घेत आता पुन्हा सुमारे 75 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर नियमानुसार गतिरोधक बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. (Pune Traffic News)
महापालिकेच्या पथ विभागाने या कामाचे नियोजन हाती घेतले असून पुढील काही आठवड्यांत टप्प्याटप्प्याने गतिरोधक बसवले जाणार आहेत. विशेषतः शाळा, रुग्णालये, चौक आणि वर्दळीच्या ठिकाणांजवळ वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी या गतिरोधकांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कुठल्या भागांत बसवले जाणार गतिरोधक? :
पुणे ग्रँड टूर स्पर्धेदरम्यान शहरातील अनेक प्रमुख मार्गांवरून सायकलपट्टूंची स्पर्धा झाली होती. त्या काळात बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, सेनापती बापट रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता, जंगली महाराज चौक, पेठ परिसर, बाणेर, बालेवाडी आणि औंध या भागांतील गतिरोधक हटवण्यात आले होते. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता याच मार्गांवर पुन्हा गतिरोधक बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
स्पर्धेदरम्यान सायकलपट्टूंना वेगात अडथळा येऊ नये म्हणून गतिरोधक काढण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सामान्य वाहतुकीत वाहनांचा वेग वाढल्याने अपघातांचा धोका वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहतुकीचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याचे मत महापालिकेने व्यक्त केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Pune Traffic News | नियमांनुसार आधुनिक गतिरोधक बसवण्यावर भर :
महापालिकेकडून बसवले जाणारे गतिरोधक इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये योग्य उतार, स्पष्ट पांढरे पट्टे, तसेच अंध आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी सोयीस्कर रचना असलेले विशेष गतिरोधक बसवले जाणार आहेत. पूर्वी नियमबाह्य उंचवट्यांमुळे दुचाकीस्वारांना त्रास आणि अपघात होण्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे यावेळी गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या निकषांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, पुणे ग्रँड टूरसाठी 75 किमीचा मार्ग तयार करताना नियमानुसार गतिरोधक हटवण्यात आले होते. आता स्पर्धा संपल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्याच मार्गांवर पुन्हा नियमानुसार गतिरोधक बसवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.






