Pune Traffic Update | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने वाहतूक पोलिसांकडून कडक नियोजन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी लष्कर आणि डेक्कन जिमखाना परिसरात सायंकाळी ५ वाजल्यानंतर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्ता या भागात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने हे रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत जड वाहनांना पुणे शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबतच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
फर्ग्युसन आणि जंगली महाराज रस्त्यावर वाहतूक बदल :
फर्ग्युसन रस्ता (Ferguson Road Closed) आणि जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेता, कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता आणि अलका चित्रपटगृह मार्गे वळवण्यात येणार आहे. तसेच जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असून पर्यायी मार्ग म्हणून गोखले स्मारक चौक, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा वापर करण्यात येणार आहे. (Pune Traffic Update)
फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार असून ही बंदी पहाटे ५ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (JM Road Closed)
Pune Traffic Update | महात्मा गांधी रस्त्यावर संध्याकाळीनंतर नो-व्हेईकल झोन :
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात सायंकाळी ५ वाजल्यानंतर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकदरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे थांबवून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात येणार आहे. (New Year Celebration Pune)
बाबासाहेब आंबेडकर रस्ता, अरोरा टॉवर्स, व्होल्गा चौक ते महंमद रफी चौक, तसेच इंदिरा गांधी चौक ते महावीर चौक या मार्गांवरही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनदरम्यान पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






