नागरिकांनो पुण्यात गाडी चालवण्याआधी ‘ही’ बातमी नक्की वाचा!

On: November 18, 2025 12:21 PM
Pune Traffic Rules
---Advertisement---

Pune Traffic Rules | गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात अपघातांचे प्रमाण सतत वाढत असून वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. विशेषत: नवले ब्रिजवर नुकताच झालेला भीषण अपघात संपूर्ण शहराला हादरवून गेला. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने गंभीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून वाहनचालकांसाठी कडक नियम लागू करण्यात येणार आहेत.

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वाहतूक शाखेस कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता दंड आकारण्यासोबतच वारंवार नियमभंग करणाऱ्यांची गाडी जप्त करण्यापर्यंत कारवाई होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी आता वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.

कडक कारवाईचे आदेश :

शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकावर तात्काळ दंड आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे जर एखाद्या वाहनचालकाने तीन वेळा नियमभंग केला, तर त्याचा वाहनचालक परवाना रद्द करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होणार आहे. परवाना रद्द झाल्यानंतरही नियमांचे उल्लंघन केल्यास त्या वाहनाची थेट जप्ती केली जाणार आहे.

विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी अपघात नियंत्रण, वाहतूक सुधारणा आणि रस्ते व्यवस्थापनाबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची कारणमीमांसा करण्यासाठी संबंधित विभागांना त्वरित अहवाल मागवण्यात आला आहे. त्याचबरोबर या मार्गावरील अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लवकरात लवकर राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pune Traffic Rules | रस्ते सुरक्षेसाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनचा अभ्यास; ट्रॅफिक वार्डनची तात्पुरती नियुक्ती :

शहरातील गर्दीची ठिकाणे, अपघातग्रस्त रस्ते आणि रस्त्यांच्या रचनेतील त्रुटी दूर करण्यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनकडून अभ्यास करण्याची सूचना देण्यात आली आहे. या अभ्यासाच्या अहवालानुसार आवश्यक सुधारणा तात्काळ राबवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तसेच पुणे शहर वाहतूक शाखेने अतिरिक्त मनुष्यबळासाठी राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर केला आहे आणि त्याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे.

दरम्यान, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होईपर्यंत शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर तात्पुरते ट्रॅफिक वार्डन नियुक्त करण्यात येणार आहेत. नवले पुल मार्गाचा पुनः अभ्यास करण्याची जबाबदारी देखील सेव्ह लाइफ फाउंडेशनकडे देण्यात आली आहे. या बैठकीस PMC आयुक्त नवल किशोर राम, प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीएमएल अध्यक्ष पंकज देवरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Pune Traffic Crackdown)

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यांची स्थिती नियमित तपासण्याचे, रस्ते खराब असल्यास संबंधित विभागांवर कारवाई करण्याचे आणि दरमहा रस्ता सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले. आगामी काळात अपघात नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना पाहायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

News Title: Pune Traffic Crackdown: Driving License Cancellation and Vehicle Seizure for Repeat Offenders

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now