Pune Smart Bus | पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील सार्वजनिक वाहतूक अधिक आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दिशेने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बसची प्रतीक्षा करताना उन्हाचा तडाखा, पावसाचा त्रास आणि अपुऱ्या सुविधांमुळे होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी शहरात 200 अत्याधुनिक बस शेल्टर उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
आधुनिक सुविधांसह बसथांब्यांचे नूतनीकरण :
पुणेकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पीएमपीएमएल बससेवेने केवळ बसमार्ग आणि फेऱ्यांमध्ये वाढ करण्यापेक्षा प्रवाशांच्या दैनंदिन अनुभवात सुधारणा करण्यावर भर दिला आहे. या नव्या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात दोन्ही शहरांतील सर्वाधिक प्रवासी वर्दळ असलेल्या 200 बसथांब्यांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज बस शेल्टर उभारण्यात येणार आहेत. (Pune Smart Bus News)
नवीन शेल्टरमध्ये आरामदायी आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्यामुळे बसथांब्यांवरील हालचालींवर सतत देखरेख ठेवणे शक्य होईल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्व प्रवाशांना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे.
Pune Smart Bus | ‘बेस्ट’च्या धर्तीवर माहितीपूर्ण शेल्टर :
या प्रकल्पातील विशेष बाब म्हणजे 200 पैकी 50 बस शेल्टर मुंबई (Mumbai) येथील बेस्ट (BEST) बससेवेच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहेत. ही शेल्टर केवळ प्रवाशांना निवारा देणारी ठिकाणे नसून, आधुनिक माहिती केंद्र म्हणूनही कार्य करतील.
प्रवाशांना बससेवेची अद्ययावत माहिती मिळावी यासाठी प्रत्येक ठिकाणी डिजिटल फलक बसविण्यात येतील. संबंधित बसमार्ग, पुढील बस येण्याचा अंदाजित वेळ आणि इतर महत्त्वाची माहिती रिअल-टाइम स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याशिवाय मोबाईल चार्जिंगची सुविधाही देण्यात येणार आहे.
तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या पीएमपीचे सुमारे साडेआठ हजार बसथांबे असून, उर्वरित थांब्यांचेही टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून, संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.






