Pune Old Vehicles Ban | पुणे (Pune) शहरातील वाढते प्रदूषण आणि सततची वाहतूक कोंडी या गंभीर समस्यांवर उपाय म्हणून प्रशासनाने महत्त्वाचं पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना शहरात प्रवेश नाकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास लाखो वाहनधारकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात राज्य सरकारकडे औपचारिक प्रस्ताव पाठवला आहे. (Pune Old Vehicles Ban)
जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव आणि वाहनांची संख्या :
पुणे (Pune) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांनी जुन्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांवर ‘नो एन्ट्री’ लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. शहरात आणि आसपासच्या परिसरात वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली असून, वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर निर्णयाचा विचार सुरू केला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) च्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात 15 वर्षांपेक्षा जुनी एकूण 7 लाख 29 हजार 695 वाहने नोंदणीकृत आहेत. यामध्ये 6 लाख 83 हजार 411 खासगी वाहने असून 46 हजार 284 वाहने व्यावसायिक किंवा परिवहन श्रेणीतील आहेत. विशेष बाब म्हणजे, यातील सर्वाधिक म्हणजे 5 लाख 12 हजार 575 वाहने ही दुचाकी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यास ही सर्व वाहने स्क्रॅपेज धोरणाच्या किंवा थेट प्रवेशबंदीच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. (Pune Old Vehicles Ban)
या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शहराच्या रस्त्यांवर धावणाऱ्या जुन्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुणे आरटीओकडून सध्या या वाहनांची सविस्तर माहिती गोळा केली जात असून, संपूर्ण डेटा आणि नियोजित आराखडा राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
Pune Old Vehicles Ban | प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि संभाव्य परिणाम :
जुन्या वाहनांची इंजिन क्षमता कालांतराने कमी होते. त्यामुळे ही वाहने नव्या वाहनांच्या तुलनेत अधिक धूर आणि घातक वायू सोडतात. परिणामी हवेतील नायट्रोजन ऑक्साइड्स आणि इतर विषारी घटकांचे प्रमाण वाढत असून, पुण्यातील प्रदूषण पातळी चिंताजनक होत आहे. प्रशासनाच्या मते, जुन्या वाहनांवर निर्बंध आल्यास या घातक वायूंच्या प्रमाणात मोठी घट होऊ शकते.
याशिवाय, जुनी वाहने वारंवार तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडण्याचे प्रकार घडतात. अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे अशा बिघाडांचा थेट परिणाम वाहतूक कोंडीवर होतो. अनेकदा नागरिकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागते. जुन्या वाहनांची संख्या कमी झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. (Pune Old Vehicles Ban News)
प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पुण्यातील रस्त्यांवरून जवळपास 7 लाख जुनी वाहने हटवली जातील. यामुळे प्रदूषणाचे प्रमाण 80 ते 90 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, तर नायट्रोजन ऑक्साइड्ससारखे घातक वायू सुमारे 70 टक्क्यांनी घटतील, असा दावा केला जात आहे. पर्यावरणतज्ज्ञांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी, मध्यमवर्गीय वाहनधारक आणि दुचाकीस्वारांमध्ये मात्र चिंता वाढली आहे. आता राज्य सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.






