Pune Municipal Election | पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या मतदानादरम्यान बोगस मतदानाचा गंभीर प्रकार समोर आला असून, मतदानानंतर बोटावर लावलेली शाई लिक्विड किंवा फिनरने पुसून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३४ मध्ये हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील काही मतदान केंद्रांवर अनेक महिला व मुले मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसून पुन्हा बोगस मतदान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मतदानाच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. (Pune Municipal Election)
प्रभाग ३४ मध्ये गोंधळ; एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप :
पुण्यातील नऱ्हे, वडगाव बुद्रुक आणि धायरी परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ३४ मधील धायरी फाट्याजवळील नारायणराव सणस विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मतदानानंतर बोटावरील शाई पुसत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला रंगेहाथ पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. (Rupali Chakankar Complaint)
सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला असून, संशयित व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही समोर आला आहे. या घटनेमुळे काही काळ मतदान केंद्र परिसरात तणाव निर्माण झाला होता. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांमुळे पोलिस आणि प्रशासनही सतर्क झाले आहे.
Pune Municipal Election | मार्कर पेनमुळे वाद; मुंबई-कोल्हापूर-उल्हासनगरमध्येही तक्रारी :
राज्यभरात यंदा मतदानासाठी पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत मतदान करून परतलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनीही नखावरील शाई पुसली जात असल्याची कबुली दिली आहे. (Pune Municipal Election)
कोल्हापूर (Kolhapur) आणि उल्हासनगरमध्येही (Ulhasnagar) अशाच तक्रारी समोर आल्या असून, मतदानानंतर बोटावरील शाई लगेच निघत असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर टीका होत असून, शाई अधिक गडद व त्वचेला लागेल अशा पद्धतीने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Voting Ink Erased)






