भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, देवेंद्र फडणवीस संतापले!

On: January 15, 2026 1:41 PM
Maharashtra Cabinet Decision
---Advertisement---

Nagpur Municipal Election | नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर राजकीय तणाव निर्माण झाला असून, प्रभाग क्रमांक 11 मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे (Bhushan Shingane) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. या हल्ल्यात भूषण शिंगणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या चेहऱ्याला, नाकाला जबर मार लागला आहे, तसेच त्यांचा एक हातही फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन शिंगणे यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “कोणत्याही प्रकारची दहशत आमचा पक्ष खपवून घेणार नाही. अशा दहशतीला भाजप कधीही घाबरणार नाही. या प्रकरणात आधीच इंटिमेशन देण्यात आलं होतं, तरीही पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली, त्याची सखोल चौकशी केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘हे प्रकरण अत्यंत गंभीर; कुणालाही सोडणार नाही’ :

फडणवीस पुढे म्हणाले, “तक्रार दिल्यानंतरही या घटनेकडे ज्या गांभीर्याने पाहायला हवे होते, तसे पाहिले गेले नाही. मी हे प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेतले आहे. त्यामुळे कोणताही गुन्हेगार यातून सुटणार नाही, याची जबाबदारी मी स्वतः घेतो.” त्यांच्या या विधानामुळे प्रशासनावरही मोठा दबाव निर्माण झाला आहे. (BJP Candidate Attack)

या हल्ल्याबाबत भाजपकडून काँग्रेसवर थेट आरोप करण्यात आला आहे. “नागपुरात काँग्रेसने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या अशाच एका गुंडाकडून भूषण शिंगणे यांच्यावर हा हल्ला करण्यात आला,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. “मुळात आता दहशत निर्माण करण्याची काँग्रेसची क्षमताच राहिलेली नाही. कोणी असे प्रकार केले तर पोलीस त्यांना ठोकून काढतील,” असेही ते म्हणाले.

Nagpur Municipal Election | दुबार मतदार आणि मतदान कमी करण्याचा कट? :

या घटनेदरम्यान दुबार मतदारांच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. “दुबार मतदार शोधण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. मतदान केंद्रात बसलेल्या एजंटांनी त्यावर आक्षेप घ्यायला हवा. कोणी दुबार मतदान केल्याचे आढळले, तर आम्हीही त्यावर आक्षेप घेऊ,” असे त्यांनी सांगितले.

“मात्र हा हल्ला नेमका कोणी केला आणि का केला, हे महत्त्वाचे आहे. मतदान कमी व्हावे, दहशत निर्माण व्हावी, यासाठीच हा प्रकार करण्यात आला असल्याचा संशय आहे,” असा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला.

गोरेवाडा परिसरात हल्ला; 40 ते 50 जणांचा जमाव :

भूषण शिंगणे (Bhushan Shingane) गोरेवाडा परिसरात वातावरण बिघडवण्याचा आणि पैसे वाटपाचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाहणीसाठी गेले होते. त्याचवेळी तिथे आधीच दबा धरून बसलेल्या 40 ते 50 जणांच्या जमावाने शिंगणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला. “भूषण शिंगणे इथून जिवंत जाऊ नयेत, अशाच उद्देशाने मारहाण करण्यात आली,” असा गंभीर आरोप शहराध्यक्ष तिवारी यांनी केला आहे.

या घटनेमुळे नागपूर महापालिका निवडणुकीच्या वातावरणावर मोठा परिणाम झाला असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

News Title: Nagpur Municipal Election 2026: CM Devendra Fadnavis Reacts Strongly After Attack on BJP Candidate

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now