Solapur Municipal Election 2026 | सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 29 महानगरपालिकांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान आमदार देशमुख कुटुंबीयांसमवेत मतदानासाठी उपस्थित राहिले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्ष आणि पक्षश्रेष्ठींविषयी केलेल्या सूचक विधानांनी अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
“मी साधा माणूस आहे, मला राजकारण कळत नाही. सगळे निर्णय वरचे नेते घेतात,” अशी कडवट प्रतिक्रिया देत आमदार सुभाष देशमुख यांनी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. त्यांच्या या विधानातून पक्षातील अंतर्गत अस्वस्थता अद्याप कायम असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
प्रचारापासून दूर राहिल्याची चर्चा, आमदारांचे मिश्कील स्पष्टीकरण :
मागील सोलापूर महापालिका निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय देशमुख यांनी भाजपला 49 जागा जिंकून देत सत्ता मिळवून दिली होती. मात्र यावेळी संपूर्ण प्रचारादरम्यान हे दोन्ही आमदार फारसे सक्रिय दिसले नाहीत, अशी चर्चा होती. याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर “मी प्रचार केला, पण माध्यमांसमोर आलो नाही,” असे मिश्कील उत्तर देत त्यांनी या चर्चांना उत्तर दिले.
“गेल्यावेळी आम्ही दोन आमदार होतो, तरी 49 जागा जिंकून आणल्या. आता पक्षाचे तीन आमदार आहेत, त्यामुळे यापेक्षा जास्त जागा यायला हव्यात,” असे खोचक विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाच्या नेतृत्वाकडे बोट दाखवले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.
Solapur Municipal Election 2026 | महायुतीबाबत निर्णय वरचेच; पक्षश्रेष्ठींवर सूचक टीका :
महापालिकेत महायुती झाली असती तर त्याचा फायदा झाला असता का, असा सवाल विचारण्यात आला असता आमदार देशमुख यांनी पुन्हा एकदा “हे सगळे निर्णय वरचे लोक घेतात, मला त्यातलं काहीच कळत नाही,” असे सांगत पक्षश्रेष्ठींवर कडवट शब्दांत टीका केली. “एकीकडे मैत्रीपूर्ण लढा म्हणतात, टीका करू नका म्हणतात; हे राजकारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळत नाही,” असे म्हणत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. (Solapur Municipal Election 2026)
माजी आमदार दिलीप माने यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये आणल्याने आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याची चर्चा आधीपासूनच होती. त्यातच तिकीट वाटपात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना डावलण्यात आल्याने ते प्रचारापासून अलिप्त राहिल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर आज मतदानाच्या दिवशी त्यांनी केलेली वक्तव्ये अधिकच महत्त्वाची ठरत आहेत.
भाजप सत्तेचा दावा, पण अस्वस्थतेचे संकेत कायम :
मतदानानंतर बोलताना आमदार सुभाष देशमुख (BJP MLA Subhash Deshmukh) यांनी केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने महापालिकेतही भाजपची सत्ता येईल, असा दावा केला. मात्र त्याचवेळी “किती जागा येतील हे सांगता येत नाही,” असे म्हणत त्यांनी सावध भूमिका घेतली. त्यांच्या प्रत्येक विधानातून पक्षाशी असलेली नाराजी आणि अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, आमदार सुभाष देशमुख यांच्या या कडवट प्रतिक्रियांचा भाजपच्या अंतर्गत राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






