Pune Mumbai Railway | पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या घाट माथ्यावरील रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे सलग दुसऱ्या दिवशीही रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. ठाकूरवाडी (Thakurwadi) ते मंकी हिल (Monkey Hill) दरम्यान रेल्वे रुळांवर आलेला ढिगारा उपसण्याचे आणि दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. परिणामी, मंगळवारी १४ महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून १३ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सुरक्षेचा उपाय म्हणून आज, बुधवारीही (८ जुलै) पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे, ज्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांचे अतोनात हाल होत आहेत.
‘डेक्कन क्वीन’सह प्रमुख १४ एक्स्प्रेस रद्द; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या या संकटामुळे केवळ पुणे-मुंबईच नव्हे, तर दक्षिण भारत, मराठवाडा, गुजरात आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांनाही मोठा फटका बसला आहे.
रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्या: पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रवाशांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’ (Deccan Queen), ‘डेक्कन एक्स्प्रेस’, ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’, ‘प्रगती एक्स्प्रेस’, ‘सिंहगड एक्स्प्रेस’ आणि ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’ या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
इतर मार्गांवरील परिणाम: मुंबई-धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी-सोलापूर, भुज-पुणे आणि सातारा-दादर एक्स्प्रेसची वाहतूकही रद्द करावी लागली आहे. याशिवाय, सीएसएमटी-कोल्हापूर एक्स्प्रेस मुंबई ते खडकी (Khadki) दरम्यान रद्द करण्यात आली असून ती खडकी स्थानकातून कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आली. एकूण ८ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
प्रवाशांना तिकिटाचा परतावा; मध्य रेल्वेकडून तत्परता
घाट विभागात वाहतूक ठप्प झाल्यामुळे ज्या प्रवाशांना आपला प्रवास रद्द करावा लागला, त्यांना रेल्वे प्रशासनाने तात्काळ आर्थिक दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) एकाच दिवसात तब्बल ७९,७४७ प्रवाशांना एकूण ५.९१ कोटी रुपयांचा परतावा (Refund) केला आहे. यामध्ये केवळ पुणे विभागातील २०,९८२ प्रवाशांच्या १.५६ कोटी रुपयांच्या परताव्याचा समावेश आहे.
रस्ते वाहतुकीला वेग; पुण्यातून १२० एसटी बस मुंबईकडे रवाना
रेल्वे सेवा बंद असली, तरी रस्ते वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि घाट रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत झाल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस सेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली आहे. सोमवारच्या खंडानंतर, मंगळवारी पुणे विभागातून मुंबईच्या दिशेने सुमारे १२० एसटी बस सोडण्यात आल्या. तसेच, पुणे-नाशिक (Nashik) मार्गावरील बस वाहतूकही पूर्णपणे सुरळीत असून ती नियोजित वेळापत्रकानुसार धावत आहे.
News Title: Pune Mumbai Railway Services Suspended Landslide MSRTC Buses Resume






