पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! मोशीत कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे रेस्क्यू सुरू

On: July 9, 2026 1:20 PM
Moshi Landslide Pimpri Chinchwad
---Advertisement---

Pune Moshi Landslide | पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात बुधवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही बचावकार्य वेगाने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा घसरून एका इमारतीवर कोसळल्याने अनेक जण त्याखाली अडकले. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विविध यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

९ जणांची सुरक्षित सुटका, आणखी काही जण अडकल्याची भीती

बचाव पथकांनी आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, अजूनही ८ ते ९ जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत असून, रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत काळजीपूर्वक सुरू आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल, NDRF, लष्कराचे जवान, पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी तैनात असून, जीवाची पर्वा न करता ते बचावकार्य करत आहेत. मोठ्या प्रमाणात मलबा असल्यामुळे रेस्क्यूमध्ये अनेक अडचणी येत आहेत.

अडकलेल्यांशी संपर्क साधण्यात यश

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी पाहणी करून बचावकार्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या ३० ते ३५ तासांत झालेल्या विक्रमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला आणि ही दुर्घटना घडली. घटनावेळी या परिसरात सुमारे २३ जण उपस्थित होते.

महाजन म्हणाले की, काही अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यात बचाव पथकांना यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही जणांचे पाय मलब्यात अडकले असल्याने त्यांना तातडीने बाहेर काढणे शक्य होत नाही. मात्र, त्यांच्यापर्यंत चहा आणि बिस्किटे पोहोचवण्यात आली असून, त्यांचा धीर टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सकाळपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार

घटनास्थळी राज्य शासन, महापालिका, NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर आपत्कालीन यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढणे हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

“थोडा वेळ लागला तरी चालेल, पण एकही जीव गमावू नये, ही आमची भूमिका आहे. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मोशीतील हे रेस्क्यू ऑपरेशन रात्रभर सुरू राहणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता या बचाव मोहिमेकडे लागले आहे.

News Title: Pune Moshi Landslide Pimpri Chinchwad Garbage Collapse NDRF

Join WhatsApp Group

Join Now