Pune Metro | पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो-3 प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून, लवकरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. यामुळे विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण :
शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग एकूण 23 किलोमीटर लांबीचा असून, या मार्गावर 23 स्थानकांची उभारणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आर. के. लक्ष्मण ते मान या 13.3 किलोमीटर अंतरावरील मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या मार्गावरील सर्व 12 स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (Pune IT City Metro Rail Limited) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अनिलकुमार सैनी (Anilkumar Saini) यांनी या संदर्भात माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रॅक उभारणी, थर्ड रेलद्वारे विद्युत पुरवठा व्यवस्था आणि अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Pune Metro | प्रवासाचा वेळ होणार कमी :
हिंजवडी आयटी पार्क परिसरात दररोज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून लाखो कर्मचारी आणि नागरिक ये-जा करतात. या परिसरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास पूर्ण करण्यासाठी किमान दीड तासांचा कालावधी लागतो.
मात्र, मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ जवळपास 45 मिनिटांनी कमी होणार आहे. याशिवाय, या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मेट्रोचे संचालन 100 महिला ट्रेन ऑपरेटर्सकडून केले जाणार आहे. प्रवाशांसाठी किमान तिकीट दर 16 रुपये प्रस्तावित करण्यात आला असून, त्याला अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी भागीदारीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे 8,500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर उर्वरित मार्गावरील कामही वेगाने पूर्ण केले जाणार आहे.






