Pune Heatwave | पुण्यातील रहिवाशांना सध्याच्या तीव्र उष्णतेपासून नजीकच्या काळात कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD – Indian Meteorological Department) वर्तवला आहे. शहर सध्या अलीकडच्या काळातील सर्वात उष्ण उन्हाळ्याचा सामना करत असून, दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. पुढील ४८ तास ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
पुणे शहरातील उष्णतेची विक्रमी नोंद-
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे (Pune) शहरात एप्रिल २०२५ मध्ये १३ दिवस कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पातळी गाठली आहे. यापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये असे १२ दिवस नोंदवले गेले होते. जानेवारी महिन्यापासूनच शहराचे तापमान सातत्याने सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे; जानेवारीत १.२, फेब्रुवारीत २.२, मार्चमध्ये २.० आणि एप्रिलमध्ये १.५ अंश सेल्सिअसने तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.
पुढील काही दिवस शहराचे कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नसल्याने उष्णतेचा हा त्रास कायम राहील.
उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा इशारा-
यावर्षी महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक प्रतिचक्रवाती प्रणाली (Anticyclonic Circulations) तयार झाल्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात आहे. हवामान विभागाच्या हंगामी अंदाजानुसार, नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार असून, राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडत आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, अकोला (Akola) येथे सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल यवतमाळ (Yavatmal) (४२.९°C), अमरावती (Amravati) (४२.८°C), वाशिम (Washim) (४२.४°C), आणि नागपूर (Nagpur) (४२.३°C) येथे तापमान नोंदवले गेले. बीड (Beed), लातूर (Latur), आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांसाठी पुढील ७२ तास उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, विदर्भातील अमरावती, वर्धा (Wardha), वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर (Chandrapur), भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), आणि गडचिरोली (Gadchiroli) या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.






