Pune Ganeshotsav 2025 | महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मानाच्या पाच गणपतींसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पुण्याची खास परंपरा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीच्या वेळांवरून वाद निर्माण होत होते. काही मंडळांचा आग्रह सकाळी लवकर मिरवणूक काढण्याचा होता, तर मानाच्या गणपतींच्या आधी मिरवणूक निघू नये असा परंपरेचा मुद्दा इतर मंडळांनी मांडला होता. यामुळेच अनेकदा तणावाचे वातावरण तयार झाले होते.
यंदा मात्र अखेर हा वाद मिटला असून गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कसबा विधानसभा क्षेत्राचे आमदार हेमंत रासने यांच्या मध्यस्थीने हा तोडगा काढण्यात आला आहे. (Pune Ganeshotsav 2025)
बैठकीत घेतला निर्णय, सकाळी 9.30 वाजता मिरवणुकीची सुरुवात :
सर्किट हाऊस येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मानाच्या पाच गणेश मंडळांचे प्रतिनिधी, इतर प्रमुख मंडळांचे पदाधिकारी तसेच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा उपस्थित होती. दीर्घ चर्चेनंतर पारंपरिक पद्धतीनेच मिरवणुका काढण्याचे ठरले. यामध्ये सकाळी 9.30 वाजता अधिकृतपणे मिरवणुकीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीचे वेळापत्रक कायम राहणार असून, इतर मंडळांनाही ठरावीक नियमानुसार मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील सर्व गणेश मंडळांचा वाद संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
Pune Ganeshotsav 2025 | नियमावली ठरवून शिस्तबद्ध मिरवणूक
मिरवणुका वेळेत पार पाडण्यासाठी काही महत्वाचे नियम आखण्यात आले आहेत. मंडळांच्या गणपतीसमोर ढोलपथकांचे स्थिर वादन होणार नाही, एकाच ठिकाणी मंडळ जास्त वेळ थांबणार नाही, तसेच दोन मंडळांमध्ये पुरेसे अंतर ठेवले जाणार आहे. तसेच विद्युत रोषणाई असलेल्या मंडळांना संध्याकाळी मार्ग मिळेल, असे ठरवण्यात आले आहे. (Pune Ganeshotsav 2025)
या नियमांच्या अंमलबजावणीमुळे मिरवणुकीत गर्दीचा अडथळा होणार नाही आणि वाहतूक व्यवस्थाही सुरळीत राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पुणेकरांना पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचा आनंद
गणेशोत्सव हा पुणेकरांच्या भावना, श्रद्धा आणि परंपरेशी जोडलेला आहे. विसर्जन मिरवणुकीवरून वाद मिटल्यामुळे यंदा भव्य, पारंपरिक आणि उत्साहवर्धक मिरवणुका पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि गणेश मंडळांच्या समन्वयातून यंदा गणपती विसर्जन कोणत्याही गालबोटाशिवाय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.






