Pune Exit Poll | पुणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोलनुसार पुण्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अंदाजामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक पक्षांना हा एक्झिट पोल धक्का देणारा ठरत आहे.
जनमतच्या अंदाजानुसार पुणे महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही भाजप मोठ्या फरकाने आघाडीवर राहणार असल्याचे संकेत मिळत असून, विरोधी पक्षांसाठी ही बाब चिंताजनक मानली जात आहे. (Pune Municipal Corporation Election 2026)
एक्झिट पोल काय सांगतो? :
एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपला सुमारे ९३ जागा मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत भाजपला ९७ जागा मिळाल्या होत्या आणि स्पष्ट बहुमत मिळालं होतं. यावेळी थोडी घट दिसत असली तरीही भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Pune Exit Poll News)
या एक्झिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला ६ जागा, तर शिवसेना ठाकरे गटाला ७ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांची कामगिरी मर्यादित राहणार असल्याचे चित्र या अंदाजातून स्पष्ट होत आहे.
Pune Exit Poll | राष्ट्रवादीला मोठा धक्का; मनसेचं खातंही न उघडण्याची शक्यता :
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४३ जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ ८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती, मात्र यावेळी पक्षातील फूट आणि बदललेल्या राजकीय समीकरणांचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. ( BJP Pune Victory)
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात खातेही उघडता न आल्याचा अंदाज या एक्झिट पोलनुसार व्यक्त करण्यात आला आहे. तर अपक्ष उमेदवार २ ते ३ जागांवर विजय मिळवू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Pune Exit Poll News)
गेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली होती. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन भाजपविरोधात लढले असले, तरी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुण्यात भाजपची आघाडी कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रत्यक्ष निकाल काय येतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






