पुण्यात मोठी कारवाई; धारदार शस्त्रसाठा जप्त, पोलिसांच्या सापळ्यात अडकला सराईत गुन्हेगार

On: March 27, 2026 6:44 PM
Pune Crime |
---Advertisement---

Pune Crime | प्रतिनिधी अमित मुंडीक: पुणे (Pune) शहरात सुरक्षितता राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’ (Combing Operation) दरम्यान एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पर्वती (Parvati) पोलिसांनी विशेष मोहीम आखून एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रांचा साठा हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

२५ मार्च २०२६ रोजी पोलीस अंमलदार महेश मंडलिक आणि राकेश सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने तत्काळ सापळा रचला. तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी आणि त्यांच्या पथकाने शैलेश विजय कसबे (रा. जनता वसाहत, पर्वती) याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता १० धारदार लोखंडी पालगन आणि २ धारदार तलवारी असा एकूण १४,४०० रुपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हा शस्त्रसाठा बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९/२०२६ नोंदवण्यात आला असून आर्म अॅक्ट कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग Rajesh Bansode, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ Milind Mohite आणि सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग Dhanyakumar Godse यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात आली.

पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश मरगजे करत असून या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्रसाठ्यावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp Group

Join Now