पुण्यातील पाबे घाटात भीषण अपघात; पर्यटकांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली

On: June 28, 2026 11:28 AM
Pune bus Accident
---Advertisement---

Pune Bus Accident | पुणे जिल्ह्यातील पाबे घाटातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईहून राजगड किल्ल्यावर सहलीसाठी निघालेल्या पर्यटकांची टेम्पो ट्रॅव्हलर शनिवारी मध्यरात्री खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर अंधार, पाऊस आणि कठीण परिस्थितीची पर्वा न करता हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, वेल्हे पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य हाती घेत जखमींना सुरक्षित बाहेर काढले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक संदीप तुकाराम गायकवाड (वय 47) हे अंधेरी (पूर्व), मुंबई येथून सुमारे 20 पर्यटकांना घेऊन राजगड किल्ल्यावर जात होते. शनिवारी रात्री पाबे घाट उतरत असताना पावसामुळे रस्ता निसरडा झाला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळून अनेक वेळा पलटी झाली.

अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. अनेक प्रवासी वाहनात अडकून पडल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस, हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

अपघातात दोघांचा मृत्यू

या दुर्घटनेत विश्वास बाबुराव धातीय (वय 25, नेहरूनगर, विलेपार्ले, मुंबई) यांचा मृत्यू झाला. तसेच एका तरुणीचाही मृत्यू झाला असून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. जखमी प्रवाशांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून चालक संदीप गायकवाड यांनाही दुखापत झाली आहे.

रात्रभर बचावकार्य

दरीत कोसळलेल्या वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, वेल्हे पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तपणे रात्रभर बचावकार्य केले. त्यांच्या तत्परतेमुळे अनेक जखमींना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करता आले.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणाची नोंद वेल्हे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान, पावसाळ्यात घाटरस्त्यांवर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहनचालना करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

News Title: Pune bus Accident in Pabe Ghat Rajgad Lonavala Region

Join WhatsApp Group

Join Now