पुण्यात भोंदूबाबाकडून 20 वर्ष महिलेवर अत्याचार! धक्कादायक साहित्य जप्त

On: June 18, 2026 4:24 PM
Pune Bhondu Baba
---Advertisement---

Pune Bhondu Baba | खराडी परिसरातील कथित भोंदू बाबा राधामोहन मिश्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप समोर आले असून पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेत अनेक वर्षे मानसिक, भावनिक, आर्थिक तसेच लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१०/२०२६ अंतर्गत विविध गंभीर कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपी राधामोहन मिश्रा याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत २००१ ते २०२६ या कालावधीत पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, २००९ ते २०२६ दरम्यान तिच्यावर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. तसेच आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मारहाण, शिवीगाळ, अमानुष वागणूक आणि लैंगिक अत्याचार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात राधामोहन मिश्रा याच्यासह स्वामी कंवल नयन, किर्ती अहुजा, कनिका अहुजा, खुशबू हुडिया, श्वेता मिश्रा, अमृता मिश्रा आणि श्वेता पांडे यांना अटक करण्यात आली आहे.

भुयारी खोल्यांमधून मोठा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या छापेमारीदरम्यान कथित भुयारी खोल्यांतून मोठ्या प्रमाणात डिजिटल आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यामध्ये ८ लॅपटॉप, ११ मोबाईल फोन, १९ हार्ड डिस्क, २९ कॅसेट, २३ पेनड्राईव्ह आणि १० जिवंत काडतुसे आढळून आली आहेत.

याशिवाय विविध प्रकारच्या औषधांच्या गोळ्यांचाही साठा सापडला असून त्यांचा वापर नेमका कशासाठी केला जात होता, याचा तपास सुरू आहे. घटनास्थळी सुमारे २५ ते ३० महिला-पुरुष कार्यरत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

१५ वर्षांहून अधिक काळ छळाचा आरोप

तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिला तब्बल १५ ते १७ वर्षे सतत मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. दररोज विविध “टास्क” दिले जात आणि त्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जात असल्याचा आरोपही तिने केला आहे.

अखेर या त्रासाला कंटाळून तिने सीसीटीव्ही कॅमेरा तोडून तेथून पळ काढला आणि पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करत छापेमारी केली. या मोहिमेत १०० हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होते.

पोलिसांचे काय म्हणणे?

अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी एफआयआर दाखल होताच तातडीने कारवाई करण्यात आली. आतापर्यंत दोन पुरुष आणि सहा महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांवर मानसिक दबाव निर्माण करून त्यांचे नियंत्रण ठेवले. फसवणूक, अत्याचार, लैंगिक शोषण आणि कुटुंबातील नातेसंबंध बिघडवण्यासाठी मानसिकरीत्या प्रभावित केल्याचे आरोप तपासात समोर आले आहेत.

छापेमारीदरम्यान रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोठ्या प्रमाणात डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे. या सर्व साहित्याची तपास यंत्रणांकडून सखोल छाननी सुरू आहे.

तपास सुरूच

पोलिसांच्या मते, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. या प्रकरणात आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता असून तपासादरम्यान आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

News Title: Pune Bhondu Baba Radhamohan Mishra Arrest Kharadi

Join WhatsApp Group

Join Now