Ayush Komkar Murder | पुण्यातील नाना पेठ परिसरात गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी झालेल्या टोळीयुद्धातून झालेल्या आयुष कोमकर (Ayush Komkar Murder) खून प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील अटक आरोपींचे धागेदोरे थेट गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. गुन्हे शाखेने आंदेकर टोळीतील चौघांना गुजरात सीमेवरून ताब्यात घेतले असून, त्यांना ट्रान्झिट रिमांडवर पुण्यात आणले जाणार आहे. सोमवारी त्यांना विशेष ‘मकोका’ न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणात बंडू आंदेकरचा दुसरा मुलगा कृष्णा आंदेकर (Krushna andekar) अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके सक्रिय आहेत. या खुनात एकूण १३ आरोपींवर खुनासह मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुषच्या आईने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अटक आरोपी, फरारी व मकोका कारवाई :
या प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये शिवम आंदेकर (३१), अभिषेक आंदेकर (२१), शिवराज आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर (६०) यांचा समावेश आहे. याशिवाय वृंदावनी वाडेकर, तिचे मुलगे तुषार व स्वराज वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे आणि सुजल मेरगु यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. कृष्णराज ऊर्फ कृष्णा आंदेकर (Krushna andekar) हा मुख्य आरोपी फरार आहे.
पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवले असून, फरारींचा शोध तीव्र केला आहे. सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई सुरू आहे.
Ayush Komkar Murder | आंदेकरांच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल :
गुन्हे शाखेच्या तपासात आंदेकर कुटुंबीयांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. या झडतीत ७७ तोळे सोने, अडीच लाख रुपये रोकड, चांदी, मोटारी, जमीन व बँक व्यवहारांची कागदपत्रे असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय वृंदावनी वाडेकर आणि तिच्या मुलांच्या घरातून २१ हजार रोकड, १६ मोबाइल आणि दागिन्यांच्या पावत्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. (Ayush Komkar Murder Case)
या कारवाईनंतर आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तपास आता या संपत्तीच्या उगमावर केंद्रित होणार आहे.
घटनेचा उलगडा आणि पुढील तपास :
५ सप्टेंबर रोजी भवानी पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आयुष कोमकरचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी यश पाटील (Yash patil) आणि अमित पाटोळे (Amit patole) यांना अटक केली होती. त्यानंतर बंडू आंदेकर (Bandu andekar) आणि त्याच्या साथीदारांना बुलढाणा परिसरातून पकडण्यात आले. मात्र कुटुंबातील काही आरोपी फरार राहिले होते.
सध्या गुजरात सीमेवरून अटक केलेल्या चौघांना पुण्यात आणले जात आहे. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, या प्रकरणात सर्व आरोपींविरुद्ध पुरावे मजबूत केले जात आहेत. गुन्हे शाखेची पथके अजूनही फरारी कृष्णा आंदेकरच्या मागावर आहेत.






