Pune News | पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणारी वाहनसंख्या यामुळे दररोज विद्यापीठ चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असे. अनेक वर्षांपासून या समस्येवर तोडगा निघावा अशी मागणी होत होती. अखेर पुणेकरांसाठी गूड न्यूज आली आहे. औंध-शिवाजीनगर मार्गावरील दुमजली उड्डाणपूलाचे एक बाजूचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, औंध ते शिवाजीनगर या दिशेच्या बाजूचे काम पूर्ण झाले असून 20 ऑगस्टपासून ही बाजू वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील दररोजची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
दुमजली उड्डाणपूलाचे वैशिष्ट्य आणि फायदे :
या दुमजली उड्डाणपुलाची खासियत म्हणजे येथे रस्त्यावरील वाहनांसोबतच मेट्रो वाहतुकीची सोय होणार आहे. पुणे महानगर परिवहन विकास प्राधिकरणानुसार (PMRDA) संपूर्ण प्रकल्पाचे 90 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्याचे डांबरीकरण व वाहतुकीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत.
सध्या बाणेर आणि पाषाणकडील रॅम्पचे काम सुरू असून ते ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हिंजवडी आणि शहरातील इतर भागांकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Pune News | पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल घडणार :
या प्रकल्पामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहनांचा ताण लक्षणीय प्रमाणात कमी होईल. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होईल. उड्डाणपूल खुला झाल्यानंतर वाहतुकीची गती वाढून पुणेकरांचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
याशिवाय वाढत्या शहरीकरणाचा आणि वाहनांच्या संख्येचा विचार करून गणेशखिंड रस्त्याची रुंदी 45 मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. हा दूरदृष्टीने घेतलेला निर्णय भविष्यातील वाहतूक समस्यांवर उपाय ठरणार आहे.






