Maharashtra Congress | राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत असतानाच, आता परभणी जिल्ह्यातून काँग्रेसला हादरा देणारी एक मोठी माहिती समोर येत आहे. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे (Maharashtra Congress) महत्त्वाचे नेते आणि जिल्हाप्रमुख, माजी आमदार सुरेश वरपूडकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसला मोठा धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे परभणी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी मुंबईत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वरपूडकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा परभणी जिल्ह्यात सुरू होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
Maharashtra Congress | सुरेश वरपूडकर भाजपच्या वाटेवर
चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश वरपूडकर यांच्या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या भेटीवेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि भाजपचे जिल्हाप्रमुख सुरेश भुमरे हे देखील उपस्थित होते. येत्या २४ जुलै रोजी सुरेश वरपूडकर यांचा मुंबई येथे भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे, ज्यामुळे परभणीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वरपूडकर यांच्या भाजप प्रवेशाची तारीखही समोर आल्यानंतर आता परभणीच्या काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. वरपूडकर हे काँग्रेसचे जिल्हाप्रमुख असल्यामुळे परभणीत त्यांची चांगली ताकद आहे. याच कारणामुळे ते जर भाजपमध्ये जाणार असतील, तर त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वरपूडकर यांचा भाजप प्रवेश म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तसेच, वरपूडकर भाजपमध्ये गेल्यास त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






