Animal Care l उन्हाळ्यात तापमान प्रचंड वाढते, त्यामुळे गाई-म्हशींसह इतर जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. एप्रिल आणि मे हे महिने अत्यंत उष्ण असल्याने तापमान 25 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास जनावरांच्या आरोग्य, प्रजनन क्षमता आणि दुधाच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वाढत्या उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्माघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात त्यांच्या योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
उष्माघात म्हणजे काय? :
उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे जनावरांच्या शरीराचे तापमान अचानक वाढू शकते. जर शरीरात साचलेली उष्णता बाहेर पडू शकली नाही किंवा वातावरणातील गरमीचा परिणाम शरीरावर झाला, तर त्यांचा शारीरिक ताण वाढतो. अशावेळी जनावरांचे शरीर तापते, ते अस्वस्थ वाटते आणि तापमान 103 ते 110 अंश फॅरनहाइटपर्यंत पोहोचू शकते. परिणामी, त्यांना थकवा जाणवतो, ते बेशुद्ध पडू शकते आणि वेळेवर उपचार न केल्यास जीवसुद्धा जाऊ शकतो.
Animal Care l उष्माघात होण्याची कारणे :
– सतत उन्हात जड ओझे वाहून नेणे किंवा काम करवून घेणे.
– उष्णतेच्या वेळेत बैलांना शोभायात्रा किंवा पारंपरिक सणांमध्ये सामील करणे.
– गोठ्यात गरमीचे प्रमाण जास्त असणे किंवा वायुवीजनाचा अभाव.
– दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे.
– उन्हाळ्यात जनावरांना चारणासाठी बाहेर सोडणे आणि पुरेसे पाणी न मिळणे.
– गरम वातावरणातून थंड पाण्यात अचानक अंघोळ घालणे.
उष्माघाताची लक्षणे :
– शरीराचे तापमान 103 ते 110 अंश फॅरनहाइटच्या पुढे जाणे.
– जनावर धापा टाकणे आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढणे.
– त्वचा कोरडी आणि गरम होणे.
– खाण्या-पिण्याची इच्छा कमी होणे किंवा पूर्णपणे बंद होणे.
– तोंडातून सतत लाळ येणे आणि जास्त घाम येणे.
– तहान अधिक लागणे आणि जनावर सतत पाण्याकडे जाण्याचा प्रयत्न करणे.
– शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे कमजोरी येणे.
– गरोदर गाई-म्हशींच्या बाबतीत गर्भपात होण्याची शक्यता.
जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण कसे करावे? :
– सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा चरण्यासाठी नेणे.
– गोठ्यात खेळती हवा राहील याची व्यवस्था करणे आणि छताला गवत किंवा टाइल्स लावणे.
– जनावरांसाठी स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे.
– जास्त वेळ उन्हात ठेऊ नये आणि कामानंतर त्यांना विश्रांती देणे.
– गरम वातावरणातून थंड पाण्यात अचानक अंघोळ घालू नये.
– शरीरातील क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांना खनिज मिश्रणयुक्त आहार देणे.








